सांगली : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात शिकार आणि अवैध वन्य प्राण्याच्या अवयवांचा चोरटा व्यापार रोखण्यासाठी कोल्हापूरमध्ये सायबर सेल सुरू करण्यात आला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे हा सेल कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले. या सेलचे उद्घाटन क्षेत्र संचालक आर.एम. रामानुजम यांच्या हस्ते करण्यात आले.
याबाबत माहिती देतांना विभागीय वन अधिकारी एस.एस. पवार यांनी सांगितले, वन्यजीव व वनगुन्हे यांना आळा घालण्यासाठी संशयित आरोपी यांच्यावरील आरोप सिद्द होण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती या सायबर सेलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी तसेच तपास करण्यासाठी वन विभागाकडील क्षेत्रिय कर्मचारी, अधिकारी यांना लाभ होणार आहे.
हेही वाचा…मनोज जरांगेंनी उडवली खिल्ली, “चंद्रकांत पाटलांना काय कळतं? ‘तेरे नाम’ भांग पाडून..”
वने व वन्यजीव विषयक गुन्हे हाताळणे व आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करणे व राज्या बाहेरील आरोपींनाही पकडणे सोईचे होणार आहे. सायबर सेलच्या माध्यमातून वने व वन्यजीव गुन्ह्यामधील आरोपींना शिक्षा होण्यास मदत मिळणार असून क्षेत्रिय कर्मचार्यांना त्याचा अधिकचा फायदा होऊन त्यांचे मनोबल वाढणार आहे.