कल्पेश भोईर

हजारो केळींची झाडे भुईसपाट; लाखोंचे नुकसान, बागायतदार हवालदिल

वसई : समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका वसईची सुप्रसिद्ध असलेल्या केळीच्या बागांनाही  बसला आहे. या वादळात वसई-विरार भागातील हजारो केळीची झाडे उद्ध्वस्त झाली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे बागायदार हवालदिल झाले आहेत.

वसईतील परिसर हा केळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातून मोठय़म प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. सध्या वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ लागल्याने ठरावीक  ठिकाणीच केळीची लागवड केली जात आहे. त्यामध्ये नाले, उंबरगोठण, सागरशेत, सत्पाला, राजोडी, देवतलाव, यासह इतर विविध भागांमध्ये केळीच्या झाडांची लागवड केली जाते. वसईतील केळी मुंबईसह विविध ठिकाणच्या बाजारात  विक्रीसाठी पाठविली जातात. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णत: नैसर्गिकरित्या ही केळी वाढविली जात असल्याने बाजारातही याला मोठी मागणी आहे. परंतु मागील दोन दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे हजारो केळीची झाडे ही आडवी झाली आहेत. यामुळे या बागायतदारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी केळीच्या झाडांना चांगल्या प्रकारे केळीसुद्धा लागली होती.मात्र ती केळी पूर्ण तयार होण्याआधीच वादळीवाऱ्याने  उद्ध्वस्त केली चक्रीवादळात वसई-विरारमधील केळीच्या बागा उद्ध्वस्त असल्याचे बागायतदारांनी सांगितले आहे. मागील दोन वर्षांपासून बुरशीजन्य रोग, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा विविध प्रकारची संकटे निर्माण होऊ लागल्याने वसई पट्टय़ातील बागायतदार हवालदिल झाले आहेत.

यंदाच्या वर्षीच्या हंगामात तरी चांगले उत्पादन तयार होऊन दोन पैसे हाती येतील अशी आशा होती. मात्र अवघ्या एक दोन दिवसाच्या चक्रीवादळाने संपूर्ण केळीच्या बागांची दैना करून टाकल्याने यासाठी केलेली मेहनत व मशागत खर्च ही वाया गेला असून लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फेरले आहे. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात झाडे कोसळून बागायतदारांचे नुकसान केले आहे. यासाठी शासनाने ही झालेल्या नुकसाना पाहणी करून बागायतदारांना सहकार्य करावे अशी मागणी करण्यात येत आहे.वसईतील फळबागांचे अंदाजे ५० हेक्टर इतक्या क्षेत्राला वादळाचा फटका बसला असून त्याची पाहणी करण्याचे काम  करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

चक्रीवादळाच्या तडाख्याने आमच्या बागेतील ३ हजार केळीची झाडे आडवी झाली आहेत. या केळीच्या झाडांच्या मशागतीसाठी ३ लाख रुपये इतका खर्च केला त्यातून १२ लाख रुपये इतके उत्पन्न अपेक्षित होते. मात्र आता झाडेच कोसळून गेल्याने मोठा फटका बसला आहे.

फरमीन परेरा, शेतकरी उंबरगोठण वसई

वादळामुळे मोठय़ा प्रमाणात फळबागायतीचे क्षेत्र बाधित झाले आहे. नुकसानग्रस्त भागांची तालुका कृषीविभागाच्या पथकाकडून पाहणी व पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

तरुण वैती, तालुका कृषी अधिकारी वसई

Story img Loader