अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळाने आज मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवर तडाखा देण्यास सुरुवात केली असून, पहाटे पासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तर काल रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने सकाळी जोर धरला होता. दरम्यान, पावसाबरोबरच वादळी वाऱ्यामुळे देवबाग येथे माडाची झाडे मोडून पडली असून दोन वीज खांबही कोसळले आहेत. तर मालवण देऊलवाडा येथे पोफळीच्या झाडांचे नुकसान झाले आहे.

कोकणात सतर्कतेचे आदेश

काल रात्रीपासून तौते चक्रीवादळाची महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर मध्यरात्रीपासून मालवणसह जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वारा व संततधार पाऊस सुरू झाला. तर आज पहाटेपासून जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने संततधार सुरू असून अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे. मध्यरात्रीपासून मालवण शहरासह तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला असून सर्वांचीच झोप उडाली आहे.

पालघर : मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५१२ नौका समुद्रकिनारी दाखल!

समुद्रातील या वादळामुळे समुद्रही खवळला असून उंच लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. पहाटे पासून वादळाचा प्रभाव अधिक वाढला असून किनारी भागात जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देवबाग सामंत वाडी येथे माड रस्त्यावर कोसळल्याने दोन वीज खांबही मोडून पडले. तर देवबाग ख्रिश्चनवाडी येथे रिसॉर्टच्या शेडवर झाड कोसळून नुकसान झाले आहे. देवबाग येथील घरावर झाड पडून नुकसान झाले तर मालवण चौके मुख्य रस्त्यावर देखील झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. हे झाड प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाजूला करण्यात आले आहे. मालवण शहरात देखील काही ठिकाणी पडझड झाली असून शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Story img Loader