मुंबई, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा फटका बसला. अजूनही चक्रीवादळ मुंबईजवळील समुद्रात घोंगावत असून, अद्याप धोका टळलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे. ऐन करोना संकटातच चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर आलेल्या तौते चक्रीवादळावरून आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
गोव्यानंतर रविवारी सायंकाळी महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात तौते चक्रीवादळाने पाऊल ठेवलं. रात्रीपासून अद्याप चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातून संथ गतीने गुजरातच्या दिशेनं जात आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि राज्याच्या इतर भागात पडझड झाली आहे. गेल्या वर्षीही देश आणि महाराष्ट्र करोना संकटाचा मुकाबला करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता.
करोनाचा उद्रेक झालेला असताना सलग दुसऱ्या वर्षी आलेल्या चक्रीवादळाला नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवलं आहे. नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. “उद्धव ठाकरे सरकारची महाराष्ट्रातील दोन वर्ष… २०२० चक्रीवादळ (निसर्ग चक्रीवादळ), २०२१ चक्रीवादळ. २०२० आणि २०२१मध्ये करोनाबळींमध्ये पहिल्या क्रमांकावर. हे पुढे सुरूच आहे. सगळं वाईटच घडत आहे. हे तर ग्रहणांचेही बाप आहेत, बॉस,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
2 years of Uddhav Thackray Gov in Maharshtra..
cyclone 2020 .. cyclone 2021
No.1 in COVID numbers n deaths in 2020 n 2021 .. story continues..
Sub bura hi ho raha hai..Panvatiyo ka baap hai ye boss !!
— nitesh rane (@NiteshNRane) May 17, 2021
अतिरौद्रवतार धारण केलेल्या तौते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला आहे. सकाळी चक्रीवादळ मुंबईपासून जवळपास १७० किमी अंतरावर होते. सध्या १२० किमी अंतरावर चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असून, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली आहे. मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली असून, मोनो रेलची सेवा स्थगित करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरून सुरू असलेली हवाई वाहतूकही सायंकाळी ४ वाजेपर्यंत बंद करण्यात आली असून, वांद्रे-वरळी सी लिंकवरून होणारी वाहतुकही रोखण्यात आली आहे.