अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आधी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) व नंतर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र हत्येचा तपास या दोन्ही यंत्रणांकडे न सोपवता तो विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) द्यावा, अशी मागणी डॉ. दाभोलकर यांची कन्या मुक्ता हिने उच्च न्यायालयात सोमवारी केली.
डॉ. दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला, तरी आरोपींना गजाआड करणे दूरच; त्यांचा सुगावाही लागलेला नसल्याने राज्य पोलिसांकडून तपासाची सूत्रे काढून ती राष्ट्रीय तपाय यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याची मागणी केतन तिरोडकर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. या प्रकरणी हस्तक्षेप याचिका करून आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्याची मागणी मुक्ता यांनी केली होती.
या याचिकेत मुक्ता यांनी तपास ‘एनआयए’ वा ‘सीबीआय’कडे सोपविण्याऐवजी तो ‘एसआयटी’द्वारे करण्याचे आदेश देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. सहा महिन्यांपासून विविध यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास केला. परंतु ठोस असे काहीच पुरावे पुढे आलेले नाहीत वा सुगावा लागलेला नाही, असा दावा मुक्ता यांनी याचिकेत केला आहे.