अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असले, तरी योग्य वेळ येताच जाहीर केले जातील,  असे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शनिवारी सांगितले.
दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास पोलिसांच्या दृष्टीने एक आव्हान म्हणून स्वीकारण्यात आले असून गृहविभागने गांभीर्याने याची दखल घेतली आहे.  पोलिस यंत्रणा या हत्येचा तपास करण्यास सक्षम असून पोलिस दलावर माझा ठाम विश्वास असल्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या दुष्काळी भागाला टेंभू योजनेचे पाणी दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा शासनाने केली होती.  मात्र गौणखनिजाबाबत पर्यावरण विषयक र्निबध आल्याने कामे थांबली आहेत.  केवळ टेंभूचेच काम थांबले असे नव्हे.  तर सार्वजनिक बांधकाम विभागाची बहुतांशी कामे ठप्प झाली आहेत. लवकरच यावर तोडगा निघेल असे सांगून श्री. पाटील म्हणाले, की विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना जर इच्छा असेल, तर लवकरच आम्ही टेंभू योजनेच्या उद्घाटनासाठी त्यांना सन्मानाने आमंत्रित करू. टेंभू योजनेला यापुढील काळात निधीची कमतरता भासणार नाही अशी तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.