तहसील कार्यालयाच्या आवारातच असलल्या पोलीस ठाण्यातील कोठडीच्या छताची कौले काढून चार दरोडखोरांनी येथून सिनेस्टाईलने पलायन केले. त्यांना पकडण्यासाठी तीन पथके पोलिसांनी रवाना केली आहेत. जिल्ह्य़ातील कर्जत, जामखेड, श्रीगोंदे तालुक्यासह शेजारच्या जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी या गुन्हेगारांनी दरोडे घातले आहेत.
जामखेड येथे शुक्रवारी दुपारी धुवांधार पाऊस झाला. त्यामुळे दुपारीच वीजपुरवठा खंडित झाला होता, तो पहाटेपर्यंत खंडीत होता. त्याचाच फायदा घेऊन भरत विलास भोसले, सुरेश ईश्वर भोसले, रावसाहेब उर्फ रावश्या भोसले, हतीम उर्फ विशाल नारायण भोसले हे एकाच टोळीतील चौघे दरोडेखोर पळून गेले. जामखेड पोलीस स्टेशन लगतच तहसील कार्यालय आहे. पूर्वी याच आवारात पोलीस ठाणेही होते. पोलीस ठाणे नव्या इमारतीत गेले, त्यातील कोठडी जुन्याच ठिकाणी म्हणजे तहसील कार्यालयाच्या आवारातच आहे. या कोठडीवर शुक्रवारी पोलीस शिपाई आप्पा दिवटे, राहुल शेळके, गहिनीनाथ यादव, सना सय्यद व शामसुंदर जाधव असे पाच कर्मचारी नियुक्त होते. दरोडेखोर पळून गेल्यानंतर बऱ्याच वेळाने या कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आली.
एकाच टोळीतील असूनही या चौघा दरोडेखोरांना एकत्रच ठेवण्यात आले होते. जामखेड पोलिसांनी नुकतेच विविध गुन्ह्य़ांमध्ये तिघांना तर, कर्जतचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी य्टोळीचा म्होरक्या रावश्या भोसले यास पकडले होते. या चौघांनी अधांराचा फायदा घेत कोठडीच्या खोलीतील बाथरूमच्या भिंतीवर चढून एकमेकांच्या सहाय्याने छताची कौले सुरूवातीला काढली. पोलिसांच्या अंदाजानुसार कोठडीच्या छतापर्यंत पोहचण्यासाठी हे चौघे एकमेकाच्या खांद्यावर बसले. छताला लावलेली लाकडी फळी त्यांनी आधी काढली. ही फळी निघताच कौले काढणे सोपे झाले. सुरूवातीला एकजण छतावर गेला. त्याने सोबत चादर नेली असावी. ती आत सोडून एकेकाला या चादरीच्या सहाय्याने वर ओढून घेतले, चौघेही वर येताच अंधारात उडय़ा मारून ते पसार झाले.
बराच वेळाने वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर हा प्रकार येथील पोलिसांच्या लक्षात आला, तोपर्यंत हे दरोडेखोर दूरवर पोहोचले असावेत. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच नियुक्तीच्या पोलिसांनी तातडीने प्रभारी पोलीस उपाधीक्षक प्रताप इंगळे यांना कर्जत येथे फोन करून दरोडेखोरांच्या पलायनाची माहिती दिली. तेही तातडीने जामखेडकडे निघाले, लगेचच नाकाबंदीही केली, मात्र हे दरोडेखोर त्यातूनही सहीसलामत निसटले.
शनिवारी सकाळी जामखेड शहरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनीही कोठडीकडे धाव घेतली. या प्रकाराने जामखेड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातही पोलिसांबद्दल संतापाची लाट पसरली आहे.
‘काळिमा फासणारी घटना’
पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, घडलेली घटना खात्याला काळिमा फासणारी आहे. या गुन्हेगारांच्या शोधासाठी तातडीने अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची नेमणूक केली आहे. पोलीस पथके रवाना झाली आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनाही याबाबत तातडीने अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोपी लवकरच सापडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा