शोर मच गया शोर देखो आया माखन चोर, एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरे हुश्शार, गोविंदा रे गोपाळा, अशी स्पीकरवर वाजणारी एकाहून एक सरस िहदी, मराठी गीते, कुठे मराठमोळ्या ढोलताशांचा गजर, तर कुठे नाशिकबाजाच्या आणि डीजेच्या तालावर थिरकणारी पावले, काळजात धडकी भरायला लावणारे गोिवदांचे थर आणि जल्लोषात फुटणाऱ्या दहीहंडय़ा. रायगड जिल्ह्य़ात आज गोिवदोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला.
सकाळपासूनच गोविंदापथके हंडी फोडण्यासाठी बाहेर पडली. पावसाने पाठ फिरवलेली असतानाही गोविंदांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. पाण्याच्या कृत्रिम फवाऱ्यातही बालगोपाळ पावसाचा आनंद लुटत होते. दिवसभर जिल्ह्य़ात असेच चित्र पाहायला मिळत होते.
विशेष म्हणजे महिला गोविंदा पथकांची संख्याही वाढत चालली असून, त्यांच्यासाठी खास हंडय़ा बांधण्यात आल्या होत्या.
शहरी भागात उत्साहाला उधाण होते. दहीहंडी पाहण्यासाठी लहान मुले आणि महिलांची गर्दी होत असे. ग्रामीण भागात मात्र गोविंदोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.
 तेथे सनई आणि खालूबाजाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने फेर धरून गोिवदा पथके फिरताना दिसत होती. प्रसाद म्हणून मिळणारे दही, ताक-पोहे यांच्यावर ताव मरीत होती.
जिल्ह्य़ातील लाख – दीड लाख रुपयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडय़ा सर्वाचेच आकर्षण ठरल्या. अलिबाग, पनवेल, उरण, बोर्ली पंचतन, कर्जत, रोहे, महाड, गोरेगाव, पाली या शहरांतील लाखमोलाच्या दहीहंडय़ा फोडण्यासाठी ग्रामीण भागातील पथकांनीही हजेरी लावली होती.
गेला महिनाभर केलेली मेहनत फळाला यावी यासाठी सर्वाचे प्रयत्न सुरू होते. अलिबाग शहरात प्रशांत नाईक मित्र मंडळाने एक लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस लावले होते. ही हंडी फोडून बक्षिसाची रक्कम पटकावण्यासाठी तालुक्यातील गोविंदा पथके रात्री उशिरापर्यंत प्रयत्नांची शिकस्त करीत होती.
अलिबाग शहरात यानिमित्ताने चित्ररथ स्पध्रेचेही आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान बुधवारी रात्री उशिरा श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये यानिमित्ताने भजन, कीर्तन, पूजापाठ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रसाद म्हणून सुंठवडय़ाचे वाटप करण्यात आले.
महाड-पोलादपूर तालुक्यात दहीहंडी उत्साहात
महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी हे दोन्ही सण उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाड शहरामध्ये सार्वजनिक दहीहंडय़ा ६७ तर खासगी ७९ लावण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागात १०५ सार्वजनिक दहीहंडय़ा लावण्यात आल्या. तसेच खासगी ११३ दहीहंडय़ा लावण्यात आल्या. औद्योगिक वसाहतीमध्ये ८४ सार्वजनिक तर खासगी ७२ दहीहंडय़ा लावण्यात आल्या. पोलादपूर तालुक्यात ११३ सार्वजनिक तर खासगी १३८ लावण्यात आल्या होत्या. एकूण ३६९ सार्वजनिक व ४०२ खासगी दहीहंडय़ा लावण्यात आल्या होत्या. या वर्षी विविध राजकीय पक्षांतर्फे लावण्यात आलेल्या दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांसाठी पन्नास हजारापासून दीड लाखापर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती. तालुक्यासह जिल्हय़ातील अनेक गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी आले होते.
महाड शहरातील आझाद मैदानावर लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे सर्वाधिक जास्त बक्षिसाची दहीहंडी लावण्यात आली होती. रत्नागिरी रायगड जिल्हय़ातून अनेक गोविंदा पथकांनी ही हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. ज्या पथकांनी सहा थरांपासून आठ-नऊ थर लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना लोकविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली. लोकविकास प्रतिष्ठानतर्फे लावण्यात आलेली दहीहंडी काँग्रेसप्रणीत होती तर भरतशेठ गोगावले मित्र मंडळातर्फे शिवसेनेची दहीहंडी लावण्यात आली होती. शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी फोडणाऱ्या पथकांना मोठय़ा रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.
 शिवाजी चौक मित्र मंडळाने देखील या वर्षी भव्य बक्षिसे जाहीर केली होती. या मंडळाची हंडी फोडण्याचा प्रयत्न अनेक गोविंदा पथकांनी केला. या ठिकाणी देखील हंडी फोडण्यात यश आले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेदेखील दहीहंडी फोडण्याची स्पर्धा लावण्यात आली होती.
 सर्व राजकीय पक्ष या वेळी दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झाल्याने पक्षातर्फे  लाखो रुपयांची बक्षिसे लावण्यात आली. तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण महाड शहर गोविंदामय झाले होते.
तालुक्यातील चांभारखिंड येथील महिला गोविंदा पथकाने सहा थर लावून विक्रम नोंदविला तर त्याच गावातील गोविंदा पथकाने सात थर लावून विक्रम नोंदविला. खेड येथील हेमराज गोविंदा पथकाने आठ थर लावण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. या पथकाने दाखविलेले धाडस पाहून लोकविकास सामाजिक संस्थेने त्यांचा यथोचित सत्कार करून आकर्षक चषक व बक्षीस प्रदान केले.

Story img Loader