Dahi Handi 2022 Celebration: करोना काळानंतर यावर्षी संपूर्ण देशभर विशेषत: महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राज्याच्या राजधानीसह इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी दहीहंडी फोडून गोविंदानी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. नेते, अभिनेत्यांच्या उपस्थितीत डीजेच्या तालावर थिरकणारे गोविंदा पथकं आपण नेहमीच पाहतो. मात्र, यंदा कोकणात अनोख्या पद्धतीने गोविंदानी दहीहंडी साजरी केली. या दहीहंडीचा व्हिडीओ हवामान खात्यातील शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी शेअर केला आहे.
चौकात, गल्लीबोळात नव्हे तर चक्क गावातील मोठ्या विहिरीच्या मध्यभागी ही दहीहंडी बांधण्यात आली होती. विहिरीच्या कडेला गोविंदांनी थर रचला आणि त्यातील एका गोविंदाने उंच झेप घेत दहीहंडी फोडली. दहीहंडी फुटताच विहिरीच्या कडेला बसलेल्या इतर गोविंदानी विहिरीत उड्या टाकून पोहण्याचा आनंद लुटला. कोकणातील हा भन्नाट व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
दहीहंडीच्या माध्यमातून मतांची पेरणी; भाजपचा सक्रिय सहभाग, शिवसेनेवर कुरघोडी
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. या निर्णयाला राजकीय स्तरातून विरोध होत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह आरक्षणाच्या लाभ्यार्थींनीही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायचा नसतो, असा सल्ला पवारांनी शिंदे सरकारला दिला आहे.