शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कार्यक्रमात चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी एका माजी नगरसेवकानं सुर्वे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित चितावणीखोर भाषणाचा व्हिडीओही पोलिसांना देण्यात आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचं वृत्त टीव्ही९ मराठीने दिलं आहे.

बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना चितावणीखोर भाषण केलं आहे. त्यांच्या भाषणातील काही भाग व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “ह्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही. कुणी आरे केलं तर त्याला कारे करा. प्रकाश सुर्वे इथे बसलाय… त्यांना ठोकून काढा. हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा. दुसऱ्या दिवशी जामीन करून देतो, त्याची तुम्ही चिंता करू नका” अशा आशयाची विधानं सुर्वे यांनी आपल्या भाषणात केली आहेत. ते मागाठाणे मतदारसंघाचे आमदार आहेत.

हेही वाचा- बंडखोर आमदार संतोष बांगर यांना संताप अनावर; व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल

या चितावणीखोर भाषणानंतर एका माजी नगरसेवकानं सुर्वे यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी सुर्वे यांच्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader