शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धाची वाढलेली तीव्रता सामान्य नागरिकांच्या मुळावर उठली आहे. या युद्धात गेल्या आठ दिवसात चार आदिवासी ठार झाल्याने या जिल्हय़ात सामान्यांचा जगण्याचा संघर्ष आणखी कठीण होऊन बसला आहे.
आज मालेवाडापासून काही अंतरावर असलेल्या सिंदेसूर गावाजवळ झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांसह दोन आदिवासी ठार झाले तर एक आदिवासी गंभीर जखमी झाला. गेल्या ४ एप्रिलला भामरागड तालुक्यातील भटपर गावाजवळ पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते. यात ठार झालेल्या दोन आदिवासी तरूणींचा नक्षलवादी चळवळीशी फारसा संबंध नसल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. नक्षलवाद्यांनी सामानाचे ओझे वाहून नेण्यासाठी सोबत घेतलेल्या या तरूणी पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याची माहिती नंतर समोर आली होती. या घटनेची शाई वाळण्याच्या आधीच आज पुन्हा दोन सामान्य नागरिक चकमकीत ठार झाल्याने या जिल्हय़ात सध्या कमालीची दहशत निर्माण झाली आहे. सिंदेसूर गावाजवळच्या जंगलात आज नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीची माहिती पोलिसांना कळताच सी-६० ची दोन पथके या भागात रवाना करण्यात आली. पोलिसांनी बैठकीच्या स्थळाला घेरल्याचे कळताच पहारा देण्याची जबाबदारी असलेल्या एका नक्षलवाद्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. चकमक सुरू झाल्यावर गावकऱ्यांमध्ये पळापळ झाली. गनिमी युद्धात तरबेज असलेल्या नक्षलवाद्यांनी यावेळी गावकऱ्यांना समोर केले. त्यामुळे दोन गावकऱ्यांना नाहक जीव गमवावा लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या बैठकीला हजर असलेल्या दोन सामान्य नागरिकांना गोळय़ा लागल्या. त्यापैकी एक जखमी आहे व दुसऱ्याचा मृत्यू झाला. तिसऱ्या नागरिकाला गोळी लागली नाही पण त्याचा मृत्यू झाला असे गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी आज लोकसत्ताशी बोलताना सांगितले. या तिसऱ्या नागरिकाचा मृत्यू चकमक सुरू झाल्यानंतर बसलेल्या मानसिक धक्क्याने झाला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पोलिसांचे म्हणणे खरे आहे असे समजून घेतले तरी या जिल्हय़ात सुरू असलेल्या या युद्धामुळे सामान्य नागरिकांचे जीणे कठीण होऊन बसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गडचिरोली पोलिसांनी सध्या नवजीवन योजनेच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या कुटुंबांची भेट घेण्याचा उपक्रम राबवला आहे. यामुळे नक्षलवाद्यांवर कमालीचा दबाव आहे. सध्या या जिल्हय़ात तेंदूपानाच्या तोडणीचा हंगाम सुद्धा सुरू आहे. हा हंगाम सुरू होण्याच्या काळात नक्षलवादी नेहमी गावकऱ्यांच्या बैठका घेतात. या बैठकांना इच्छा नसून सुद्धा गावकऱ्यांना हजर राहावे लागते कारण बंदुकीची नळी नजरेसमोर असते. आजही त्याच नाईलाजातून गावकरी बैठकीला हजर राहिले व चकमकीत सापडले असे या भागातील लोकांचे म्हणणे आहे.
नवजीवन योजनेसोबतच पोलिसांनी नक्षलवाद विरोधी अभियान सुद्धा सध्या तीव्र केले आहे. त्याचा परिणाम चकमकीची संख्या वाढण्यात झाला असून गेल्या तीन महिन्यात १५ नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांच्या या अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी नक्षलवादी गावकऱ्यांना समोर करत असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. या आधी नक्षलवाद्यांनी शेजारच्या छत्तीसगडमधील बस्तर भागात सुद्धा हीच पद्धत वापरली होती. आता नक्षलवाद्यांकडून निरपराध आदिवासींच्या मृत्यूचा मुद्दा पुढे केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दशकापासून या जिल्हय़ात सुरू असलेल्या हिंसाचाराची झळ सोसणाऱ्या सामान्य आदिवासींना आता थेट मृत्यूने गाठणे सुरू केल्याने या सर्वाचा जगण्याचा संघर्ष आणखी कठीण झाला आहे हेच शुक्रवारच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
गडचिरोलीतील नागरिकांना नक्षलवादी-पोलीस युद्धाची झळ
शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धाची वाढलेली तीव्रता सामान्य नागरिकांच्या मुळावर उठली आहे. या युद्धात गेल्या आठ दिवसात चार आदिवासी ठार झाल्याने या जिल्हय़ात सामान्यांचा जगण्याचा संघर्ष आणखी कठीण होऊन बसला आहे.
First published on: 13-04-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily life tough in gadchiroli due to police naxal fight