लातूर : जेवणानंतर सुपारीचा एखादा तुकडा तोंडात टाकत असाल तुम्ही, पण लातूर जिल्ह्यात सुपारीचा शौक भारी. सुगंधी तंबाखूमिश्रित सुपारी खाणाऱ्याचे प्रमाण एवढे वाढत गेले, की ‘छालिया सुपारी’ची लातूर जिल्ह्यातील दिवसाची सरासरी उलाढाल आहे दोन कोटी ५० लाख रुपयांची. एवढी सुपारी फोडायची कशी, असा प्रश्न पडत असेल तर त्याचे उत्तर लातूरकरांनी शोधून ठेवले आहे. सुपारी फोडण्याची पुरेशी यंत्रे लातूरमध्ये आहेत. पूर्वी चव बदल म्हणून तोंडात टाकायची भरडी सुपारी फारशी दिसत नाही.
जेवणानंतर बडीशेप, सुपारी खाण्याची पूर्वापार पद्धत आहे. पूर्वी घरामध्ये भरडी सुपारी खाल्ली जायची. आता ही सुपारी जवळपास हद्दपार झाली आहे. केवळ धार्मिक विधीसाठीच ही सुपारी वापरली जाते. लग्न समारंभात सुपारी फोडणे यासाठी ही सुपारी वापरली जाते. खाण्यासाठी वापरली जाते ती मात्र, छालिया सुपारी. लातूर बाजारपेठेत कर्नाटक प्रांतातील मेंगलोर येथून मोठ्या प्रमाणावर सुपारीची आवक होते. छालिया सुपारीचेही सुमारे ४० ते ५० प्रकार आहेत. ग्राहकांच्या पसंतीनुसार सुपारी मागवली जाते.
सुपारी कातरण्यासाठी पूर्वी अडकित्ता वापरला जात होता आता तो घरोघरी आढळत नाही. पानटपरीवरती सुपारी खाणाऱ्यांचे प्रमाण आहे व घरगुती खाणारे कातरलेली सुपारीच दुकानातून घेतात. लातूरकर त्यास कतरी असे म्हणतात. त्यामुळे मोठ्या किराणा दुकानांमध्ये सुपारी कातरण्याचे यंत्र आले आहे. हे यंत्र तासाला सुमारे दहा किलो सुपारी कातरते. सुपारी कातरणारे कतरी सुपारीचे जसे यंत्र आहे तसे खडा सुपारी खाणारे लोक आहेत. त्याच्यासाठी देखील स्वतंत्र यंत्र आहे. या यंत्राची किंमत सुमारे ८५ हजार रुपये आहे. प्रत्येक गावातील किराणा मालाच्या दुकानात किमान एक यंत्र असतेच.
पाच हजार वस्तीच्या एका गावामध्ये दररोज किमान एक क्विंटल सुपारी विकली जाते. लातूर जिल्ह्यात मतदार संख्या आहे २३ लाख, केवळ मतदारांची संख्या सुपारी खाणारी गृहीत धरली, तरी दररोज ५०० क्विंटल म्हणजे ५० टन सुपारी खपते. सुपारीचा भाव ५०० ते ५६० रुपयापर्यंत आहे. पान टपरीवर गुटखामिश्रित सुपारी घासून मिळण्याचे प्रमाण सर्रास आहे. त्याकडेही लोकांचा कल अधिक आहे. गुटख्यावर बंदी असली, तरी अशा सुपारीसाठी लागणारे सर्व रासायनिक पदार्थ उपलब्ध होतात.
पसंतीनुसार मागणी
छालिया सुपारीमध्ये ४० ते ५० प्रकार असून, लोकांच्या पसंतीनुसार त्याची मागणी असते. मागणीनुसार त्या प्रकाराची सुपारी आपण मागवतो. इतर जिल्ह्यांच्या मानाने लातूर जिल्ह्यात सुपारी खाण्याचे प्रमाण अधिक आहे. -रोशन हरियाली, सोना सेल्स कॉर्पोरेशन, लातूर