नगर जिल्हा दलित अन्याय अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करण्यास आपला विरोध असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिर्डीत काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा हा राजकीय वर्चस्वाचा मोर्चा होता, असेही ते म्हणाले.
शिर्डी येथील मृत सागर शेजवळ कुटुंबीयांची प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त करण्यास आपला विरोध आहे. मोजक्या घटनांसाठी जिल्ह्यातील सर्वाना दलित विरोधी ठरविणे चुकीचे आहे. दलित अत्याचाराच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्यांना पायबंद घातला पाहिजे. शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण असल्याने या ठिकाणी भाविक मोठय़ा संख्येने येतात. शिर्डीतील शांतता भंग झाल्यास भक्तांवर त्याचा परिणाम होईल. येथील अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होईल. शिर्डीत शांतता राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यात झालेल्या खर्डा, नितीन साठे, सागर शेजवळ प्रकरणातील घडणाऱ्या घटनांसंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली. पोलिसांची कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणांमध्ये साक्षी घेण्यात आल्याने नगर जिल्ह्यातील दलित हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालवून ही प्रकरणे निकाली काढावी. यातील गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. शिर्डीतील शेजवळ कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे.
आंबेडकर म्हणाले, समाजात गैरविश्वासाचे वातावरण वाढत चालल्याने यातील राजकीय परिस्थिती बिघडत चालली आहे. दलित समाजाची अवस्था दलित नेत्यांच्या चुकीच्या राजकीय भूमिकेमुळेच मागासलेपणाची आहे. दलित अत्याचारप्रकरणी काही लोक त्याचे भांडवल करण्याचा उद्योग करत आहेत. मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वानाच आहे. मोर्चा दरम्यान तोडफोडीचे प्रकार घडतात, त्याचा किती बाऊ करायचा हे लक्षात घेतले पाहिजे. एका कुटुंबातील व्यक्ती जाते. पंचवीस हजारांच्या फुटलेल्या काचेची किंमत व मृत व्यक्तीची किंमत याची तुलना करणे ही बाब लांछनास्पद आहे. पीडित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना अशा प्रकारचे मोर्चे काढणे माणुसकीला धरून नाही. शिर्डीतील आक्रोश मोर्चा हा राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व स्थापित करण्यासाठी असल्याची घणाघाती टीका केली. या वेळी राहुल भडांगे, सुनील शिंदे, अमित भुईगळ, सतीश निकम आदी उपस्थित होते.

Story img Loader