शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावात चौघांना नग्न करून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण करण्यात आलेल्या चार मुलांमध्ये दोन दलित अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यातल्याच एका मुलाने आपल्यावर घडलेल्या प्रसंगाचं धक्कादायक वर्णन करताना आपल्या आईला उद्देशून आपल्या भावना सांगितल्या. या प्रकारामुळे गावात व आसपासच्या भागात दहशतीचं वातावरण असून सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
तीन दिवसांपूर्वी या मुलांना अर्धनग्न करून झाडाला उलटं टांगून मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. २१ वर्षीय शुभम माघाडे याला २५ ऑगस्ट रोजी युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य व राजू बोरगे यांनी गलांडे फार्मवर नेऊन मारहाण केली. त्यांना अर्धनग्न करून झाडाला उलटं टांगण्यात आलं. त्यानंतर मारहाण करतानाच त्यांच्यावर लघवीही केल्याचं शुभम माघाडेनं सांगितल्याचं क्विंटनं दिलेल्या सविस्तर वृत्तात म्हटलं आहे.
शुभमला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून वातावरण तापू लागलं. गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत आपला संतापही व्यक्त केला. मात्र, या चौगा मुलांनी त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग सांगितल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
“मला थुंकी चाटायला लावली आणि लघवीही केली”
“मला घरून काहीतरी बोलायचंय म्हणून ते घेऊन गेले. पण गलांडे फार्मवर मी गाडीवरून उतरताच त्यांनी मारहाण सुरू केली. माझ्यावर थुंकल्यानंतर त्यांनी ‘हीच तुझी लायकी आहे’ असं म्हणत पुन्हा मारहाण केली. ते सगळे दारुच्या नशेत होते. त्यांच्यापैकी दोघांनी मला पकडलं आणि इतर मला मारू लागले. मी त्यांना म्हटलं की तुमच्या घरी सीसीटीव्ही आहेत. ते तपासा. पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी मला त्यांची थुंकी चाटायला लावली आणि माझ्यावर लघवीही केली”, असं शुभमनं सांगितल्याचं क्विंटच्या वृत्तात म्हटलं आहे.
मित्राला संशय आला आणि घडला प्रकार उघड झाला
दरम्यान, शुभमचा मित्र दीपकला संशय आल्यानंतर तो फार्मवर गेला. मात्र, त्यालाही त्यांनी बाहेर काढलं. दीपकन तिथल्या प्रकाराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि नंतर गावकऱ्यांना दाखवल्यामुळे हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. मग गावकऱ्यांनी जाऊन शुभमची सुटका केली.
इतर मुलांच्या बाबतीतही हाच प्रकार
दरम्यान, शुभमव्यतिरिक्त इतर तीन मुलांच्या बाबतीतही हाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. शुभमच्या आधी या तिघांनाही आरोपींनी अशाच प्रकारे मारहाण करून अपमानित केलं होतं. या मुलांच्या नातेवाईकांनी आरोपींच्या गयावया केल्यानंतरही त्यांनी तो अश्लाघ्य प्रकार सुरूच ठेवल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. त्यातल्या एका मुलाच्या आईने सांगितल्यानुसार आरोपींच्या हातापाया पडून मुलांना सोडण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. हे पाहून त्यांच्या मुलाला इतका राग आणि वेदना झाल्या की हा आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस असल्याचं त्या मुलानं आईला सांगितलं.
तिसऱ्या मुलाला तर आरोपींनी नग्न अवस्थेत घरी पाठवलं. त्याच्या आजीने त्या वेळचा वेदनादायी प्रसंग क्विंटशी बोलताना सांगितला. “माझा नातू त्या दिवशी इतक्या दु:खात होता, की तो मला म्हणाला ‘आजी, आज मरेन मी’. माझ्या मुलाचा व सुनेचा मृत्यू झाल्यानंतर मी फक्त माझ्या नातवांसाठी जगतेय”, असं या महिलेनं सांगितलं.
हा सर्व प्रकार नगरमध्ये चर्चेचा विषय ठरला असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. यावर राजकीय नेतेमंडळींनीह आरोपींवर कारवाईची स्पष्ट भूमिका घेतली असताना आरोपींवर नेमकी कारवाई कधी होणार? असा प्रश्न हरेगावच्या ग्रामस्थांना पडला आहे.