पुरोगामी महाराष्ट्रात दलित कुटुंबाची हत्या होणे हा संपूर्ण मानवजातीला कलंक असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील संजय जाधव त्यांची पत्नी व मुलगा या तिघा दलितांची निर्घृण हत्या करून त्यांच्या देहाचे तुकडे करून विहिरीत टाकण्याचे अत्यंत निंदनीय कृत्य मारेक-यांनी केले. अशा प्रकारे दलितांच्या हत्या वारंवार होणे पुरोगामी महाराष्ट्रात मानवजातीला कलंक आहे. या घटनेचा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे हजारे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
या प्रकरणामध्ये दोषी असणा-यांवर कठारे कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नगर जिल्ह्य़ात दलितांवर वेळोवेळी अशा प्रकारचे हल्ले का होतात, याचाही शोध घेणे आवश्यक वाटते. यापुढे अशा प्रकारे दलितांवर होणारे हल्ले, हत्या थांबविण्यासाठी व्यापक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी जनजागरण करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ही जातिपातीचा भेदभाव न करणारी शिकवण देणारी संतांची पावन भूमी आहे. संतांच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून स्पृश्य, अस्पृश्य भेदविरहित समाजनिर्मितीच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आम्हा सर्वांचीच आहे. पुढील काळात ती जबाबदारी पार पाडण्याचे काम आम्हा सर्वांना करण्याची गरज आहे. या प्रकरणी कसून चौकशी व्हावी आणि दोषी असणा-यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी हजारे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा