अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील खर्डा गावामधील नितीन आगे या दलित युवकाची हत्या दुदैवी असल्याचे सांगत या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.
ठाणे महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उभारलेल्या चौकास मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते ‘आद्यक्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे (भांगरा)’ यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी, नगर जिल्ह्य़ातील घटना दुर्दैवी असल्याचे सांगत या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात दुष्काळाची स्थिती असो किंवा नसो. आम्ही त्यासंबंधीचे नियोजन मात्र करणार आहोत. येत्या दोन दिवसांत केंद्रीय हवामान खात्याचा अहवाल येणार असून, त्यानंतर बैठक घेऊन नियोजन करण्यात येईल. त्यामध्ये पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा आदीचे नियोजन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, आदीवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्यासह ठाणे जिल्ह्य़ातील वरिष्ठ नेते आणि आदिवासी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात आदीवासी समाजासाठी मोलाची कामगिरी करणारे वसंत पुरके, वारू सोनावणे (नंदूरबार), काळुराम दोदडे (पालघर), दादा भगाड (जुन्नर), लक्ष्मण साबळे आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वर्गीय महादू बरोरा आणि डॉ. गोविंद घारे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करून तो त्यांच्या कुटूंबियांना देण्यात आला. ठाणे महापलिका प्रशासनाने चौकाच्या नामकरणाचा कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रमाची वेळ सकाळी ९ वाजताची जाहीर केली. त्यानुसार आदीवासी समाजाचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच जमले होते. मात्र, मंत्रालयात कॅबिनेट बैठक असल्याने सुमारे तीन तास उशीराने मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी आले. तोपर्यंत कार्यकर्त्यांना कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहात बसावे लागले. उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांकरीता मंडप उभारण्यात आला होता. मात्र, तिथे पंख्यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे व्यासपीठावरील मान्यवर आणि मंडपातील कार्यकर्ते उकाडय़ामुळे घामाघुम झाल्याचे दिसून आले.