हवामानात अचानकपणे बदल होऊन झालेल्या बेमोसमी पावसाचा फटका सोलापूर शहर व जिल्ह्य़ास बसला आहे. या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा, तूर आदी पिकांसह द्राक्ष, डाळिंब यांसारख्या फळबागांची हानी झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. या पावसामुळे स्वाईन फ्लूच्या साथीचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
काल शनिवारी बराचवेळ ढगाळ वातावरण होते. मात्र रविवारी पहाटे बेमोसमी पावसाला प्रारंभ झाला. सकाळी आठपर्यंत ४.०८ मिली मीटर सरासरीने संपूर्ण जिल्ह्य़ात ४४.९२ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. केवळ अक्कलकोट भागात पाऊस पडला नाही. उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडला. तालुकानिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी मिमीमध्ये अशी : उत्तर सोलापूर-६.६०, दक्षिण सोलापूर-२.७७, बार्शी-७.५९, पंढरपूर-५.०७, मंगळवेढा-५.०२, सांगोला-४.४३, माढा-३.६८, मोहोळ-५.१८, करमाळा-२.३८ व माळशिरस-२.२०.
रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. क्वचितच सूर्यदर्शन झाले खरे; सायंकाळी पुन्हा पावसाने प्रारंभ केला. सर्वत्रच रिमझीम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत असून विशेषत: ज्वारी, गहू, बाजरी, तूर, हरभरा, कांदा, बाजरी यासह द्राक्ष व डाळिंब आणि बोर आदी फळबागांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. दोन महिन्यांपूर्वी बेमोसमी पावसामुळे पिके व फळबागांचे नुकसान झाले होते. त्यात कशीबशी वाचलेल्या पिकांना आजच्या पावसाचा फटका बसला आहे.
एकीकडे या बेमोसमी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत असताना दुसरीकडे हा पाऊस आणि खराब हवामान यामुळे रोगराई वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. विशेषत: शहर व जिल्ह्य़ात सध्या स्वाईन फ्लूचा फैलाव होत असून शहरात अलीकडे स्वाईन फ्लूसदृश्य आजाराने पाचजणांचे बळी गेले आहेत. वरचेवर रुग्णांची संख्याही वाढत आहे. यातच आता या पावसामुळे हवामानात बदल होऊन त्यापासून स्वाईन फ्लू आटोक्यात न येता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा