संबंधित औषधाच्या विक्रीवर बंदी

सांगली : बुरुशीजन्य रोग नियंत्रणासाठी वापरण्यात आलेल्या बुरशीनाशकामुळे मालगाव (ता. मिरज) येथील १९ शेतकऱ्यांच्या २५ एकरावरील द्राक्ष बाग करपली आहे. यामुळे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करताच मंगळवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला. हा प्रकार लक्षात येताच कृषी विभागाकडून संबंधित बुरशीनाशकाच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

सध्या ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून बुरशीनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. मालगावमधील एका कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांनी रोग नियंत्रणासाठी ३५ टक्के ‘मैटसैक’ या औषधाची फवारणी केली. औषध फवारणीनंतर ४८ ते ७२  तास झाल्यानंतर बागेतील पाने पिवळी पडून करपण्याचे आणि फुलोऱ्यात येऊ घातलेले द्राक्ष घड गळून पडण्यास सुरुवात झाली. पुढे चार दिवसात सगळी बागच नष्ट होण्याचे प्रकार घडले आहेत.

हा प्रकार तत्काळ लक्षात आला नाही. मात्र शेतकऱ्यांनी एकमेकांकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार ‘मैटसैक’ औषधाची फवारणी केल्यानंतरच होत असल्याचे लक्षात आले. गावातील सुमारे २५ एकर क्षेत्रावरील यंदाचे द्राक्ष पीक नष्ट झाले असून यामुळे सुमारे दीड कोटींचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत संबंधित औषध कंपनीकडे तक्रार करण्यात आली. मात्र कंपनी प्रतिनिधींनी केवळ पाहणी केली असून झालेल्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे.

दरम्यान, याबाबत कृषी विभागाकडे तक्रार करताच मंगळवारी जिल्हा कृषी अधीक्षक मनोज वेताळ यांनी उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कृषी तज्ज्ञांसह भेट देऊन पाहणी केली. शिवालीक क्रॉप सायन्सेस चंदिगड या कपंनीच्या ‘मैटसैक’ या औषधाचा वापर करण्यात आला होता. या औषधाच्या फवारणीनंतर द्राक्ष बागेवर ‘सायटोटोक्सिक’ परिणाम झाल्याचे आढळून आले आहे.

तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी कृषी विद्यापीठाच्या शात्रज्ञासमवेत पाहणी केली असून त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. बुरशीनाशकांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पुणे येथील शासकीय कीटकनाशक तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

करोनानंतर दुसरे संकट

गतवर्षी करोना संकटामुळे बागामध्ये तयार झालेल्या द्राक्षाला अपेक्षित दर मिळाला नाही. यावर्षी हे नुकसान भरून काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात असताना चुकीच्या औषधामुळे बागाच नष्ट झाल्याने नुकसानग्रस्त दोन शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

औषधे विक्री थांबविण्याचे आदेश

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून संबंधित औषधाची फवारणी करण्यात आली होती. ही फवारणी झाल्यावर द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित औषध विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

– मनोज वेताळ ,जिल्हा कृषी अधीक्षक

Story img Loader