लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २८ धरणात २३.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ९ धरणात दहा टक्क्यांहून कमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाचा लांबल्यास जिल्ह्यात पाणी प्रश्न अधिकच उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात मुरुड (१), तळा (१), रोहा (१), पेण (१), अलिबाग (१), सुधागड (५), श्रीवर्धन (३), म्हसळा (२), महाड (४), कर्जत (२), खालापूर (३), पनवेल (३), उरण (१) या तेरा तालुक्यात २८ धरणे बांधली गेली आहेत. या धरणातून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील २८ धरणात ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे. मात्र सध्या या धरणांमध्ये केवळ २३ टक्के पाणी साठा शिल्लक राहीला आहे. चिंताजनक बाब म्हणजे यातील ९ धरणांमध्ये दहा टक्क्याहून कमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणांच्या पाणी साठ्यांवर अपलंबून असलेल्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवण्यास सुरूवात झाली आहे.

आणखी वाचा-रायगडात जलप्रवासी वाहतुकीच्या कक्षा रुंदावणार, काशिद पाठोपाठ दिघी येथे रो-रो जेटीचे बांधकाम सुरू होणार

अनेक धरणे ही तीस ते चाळीस वर्ष पूर्वी बांधण्यात आलेली आहेत. ही धरणे त्याकाळी मातीने बांधली गेली आहेत. त्यामुळे काही धरणांना गळतीही लागलेली आहे. गेल्यावर्षी रायगड जिल्‍हयात पाऊस सरासरी इतका झाला होता. धरण भागात उत्तम पाऊस पडल्याने सर्व धरणे ही शंभर टक्के भरली होती. त्यामुळे जिल्ह्याचा पाणी प्रश्न गंभीर रूप धारण करेल असे वाटत नव्‍हते. परंतु मार्च महिन्‍यातच धरणातील पाणीपातळी कमालीची खाली गेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याची पातळी भलतीच खालावली आहे. सध्‍याचा धरणातील पाणीसाठा पाहता, पावसाला उशीर झाला तर पाणी समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात असलेल्या २८ धरणातील पाण्यावर नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. नवीन प्रस्तावित असलेली धरणे ही अजून कागदावरच राहिली आहेत. जिल्ह्यात सध्या २८ धरणात १५.८०४ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. म्हणजे २३.१५ टक्केच पाणी साठी शिल्लक आहे. पावसाने दडी दिल्यास ही परिस्थिती अधिकच उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-राज ठाकरेंना नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण का नाही? सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

उपलब्ध पाणीसाठा

० ते १० टक्के – फणसाड, श्रीगाव, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कोथुर्डे, उन्हेरे, अवसरे, डोणवत

११ ते ३० टक्के – सुतारवाडी, कवेळे, रानवली, पाभरे, खैरे, साळोख, भिलवले, कलोते-मोकाशी, पुनाडे

३१ ते ५० टक्के – वावा, कार्ले, वरंध, मोरबे, बामणोली.

५१ ते ६० टक्के – आंबेघर, कुडकी, संदेरी, उसरण

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dams in raigad district have reached the bottom less than ten percent water storage in 9 dams mrj
Show comments