छोटा पुढारी अशी ओळख असलेल्या घनश्याम दरोडेने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला महाराष्ट्राचा बिहार करू नको म्हणत इशारा दिला. तसेच तिच्यावर वाकडे तिकडे चाळे करून अश्लीलता दाखवल्याचा आरोपाही केला. विशेष म्हणजे घनश्याम दरोडेने गौतमीवर बोलताना अजित पवारांचंही नाव घेतलं. यानंतर आता गौतमी पाटीलने या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर दिलं.
गौतमी पाटील म्हणाली, “महाराष्ट्राचा बिहार करू नका असं बोलल्याचं मला माहिती नाही. मी त्याचा व्हिडीओही पाहिलेला नाही. ते कोण आहेत मला माहिती नाही. मात्र, तसं काहीही नाही. मी महाराष्ट्राची संस्कृती जपते आहे. मागच्या सर्व गोष्टी सोडून मी पुढे निघाले आहे. माझ्यात काय सुधारणा झाल्या आहेत हे सर्वजण पाहत आहेत.”
“तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच का दिसते?”
“तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच का दिसते? इतरही आहेत त्यांच्याकडेही लक्ष द्या. मी महाराष्ट्राचा बिहार काय केला. मला त्याचं तर उत्तर द्या. मी काय चुकली आहे ते मला सांगा. त्यानंतर इथून पुढे तुम्ही मला बोला. ते कोण आहेत, काय आहेत मला माहिती नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त बोलू शकत नाही. मात्र, मी तसं काहीही करत नाही,” असं मत गौतमी पाटीलने व्यक्त केलं.
“हुल्लडबाजी आणि छायाचित्रकाराला मारहाणीबाबत मला माहिती नव्हतं”
गौतमी पाटीलला तिच्या कार्यक्रमात झालेल्या हुल्लडबाजी आणि छायाचित्रकाराला मारहाण या प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “खरंतर त्या गोष्टीविषयी मला काहीही माहिती नव्हतं. मी कार्यक्रमाच्या येथून निघाले. अर्ध्यापर्यंत पोहचले. तेव्हा मला ही गोष्ट समजली. जे माझा कार्यक्रम पाहायला येतात त्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, कृपया वाद करू नका. आपण सगळे एकच लोक आहोत. मीही तुमच्यातीलच आहे.”
“कार्यक्रमाचा आनंद घ्या, फक्त वाद घालून कुणालाही मारहाण करू नका”
“चाहते माझा कार्यक्रम पाहायला इतक्या लांब पाहायला येतात. त्यामुळे त्यांनी माझा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. मात्र, वाद घालू नका. छान कार्यक्रमाचा आनंद घेऊन जा. मला काहीही अडचण नाही. फक्त वाद घालून कुणालाही मारहाण करू नका. या मारहाणीचा मी निषेध करते. ते साहजिक आहे, कारण एखाद्याला मारणं चुकीचंच आहे,” असंही गौतमी पाटलीने नमूद केलं.