प्रतिनिधी, सोलापूर
सबसे कातील गौतमी पाटील असं जिच्याबाबत म्हटलं जातं ती नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. गौतमीच्या कार्यक्रमाची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये आहे. नृत्यांगना गौतमी पाटील ही वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. तिच्या लावणी कार्यक्रमांमध्ये नेहमीच गोंधळ होतो. पोलिसांना लाठीमार करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सोलापुरात तिच्या लावणी कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
डिस्को दांडिया कार्यक्रमात येणार होती गौतमी पाटील
सोलापुरात एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीने गौतमी पाटीलच्या लावणी नृत्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीने ‘ डिस्को दांडिया ‘आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती. यात ती नृत्य करणार होती.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
मात्र, या काळात नवरात्रौत्सवामुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणे शक्य नसल्याने पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नाही. तसे पत्र पोलिसांनी आयोजकाना पत्र दिले आहे. गणेशोत्सवच्या काळातदेखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास राज्यात काही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती.
हे पण वाचा- गौतमी पाटीलच्या नवी मुंबईतल्या कार्यक्रमात खुर्च्यांची तोडफोड आणि राडा, पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई
सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी बार्शी येथे गौतमी पाटीलचा लावणी नृत्य कार्यक्रम आयोजित केला असता ती उशिरा आल्यामुळे मोठा गोंधळ होऊन पोलिसांना सौम्य लाठीमार करालवा लागला होता. यात कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी पाटीलविरूध्द फसवणुकीची तक्रार केली होती. त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे मात्र गौतमी पाटीलचा कार्यक्रम गोंधळ आणि पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीमाराचा अपवाद वगळता शांततेत पार पडला होता.