नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अश्लील नृत्य केल्याप्रकरणी तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. तो वाद ताजा असताना सोमवारी एका आयोजकाने गौतमी पाटीलच्या सचिवावर मानसिक त्रास दिल्याची आणि फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुसरीकडे, गौतमी पाटीलने आज साताऱ्यात भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी तिने उदयनराजेंना खास ‘गिफ्ट’ दिलं आहे. तिने एका सहकाऱ्याच्या सल्ल्यावरुन उदयनराजे यांना एक परफ्यूम बॉटल भेट दिली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ला प्रतिक्रिया देताना तिने याबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा- “रात्री पाटीलबाईला बोलवायचं का?” बारामतीत अजित पवारांची गौतमी पाटीलवर मिश्किल टिप्पणी!
उदयनराजेंच्या भेटीबद्दल माहिती देताना गौतमी पाटील म्हणाली, “उदयनराजे यांच्याशी आज अचानक भेट झाली. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आले होते. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा, यासाठी मी त्यांची भेट घेतली. उदयनराजेंना भेटायला जाताना मी पुष्पगुच्छ घेऊन गेले होते. पण एका सहकाऱ्याने सांगितलं की, उदयनराजेंना परफ्यूम खूप आवडतो, त्यामुळे आता येत असताना मी उदयनराजेंसाठी ‘परफ्यूम’ विकत घेतला.”
हेही वाचा- कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल करणाऱ्याला अटक, गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “मी तणावात…”
उदयनराजे आणि गौतमी पाटील दोघंही महाराष्ट्राच्या मनावर राज्य करतात, अशावेळी उदयनराजेंना भेटून तुला कसं वाटलं? असं विचारलं असता गौतमी पाटील पुढे म्हणाली, “उदयनराजे दादा खूप मोठे आहेत. त्यांच्याबरोबर माझं नाव घेऊ नका. मी खूप लहान आहे. माझी त्यांच्याशी तुलना करू नका. मी एक कलाकार आहे. त्यांना भेटून आज खूप छान वाटलं.”