|| नितीन बोंबाडे

रहिवाशांचा जीव धोक्यात; डहाणू नगर परिषदेचे दुर्लक्ष

डहाणू: डहाणू शहरात निष्कासित करण्यासाठी नोटीस बजावलेल्या अंजूमन या  धोकादायक  इमारतीच्या जीर्ण भिंतीची तोडफोड करुन बेकायदा दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे इमारतील रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. इमारत बेकायदा असूनही त्यावरील कारवाई टाळाटाळ होत असून आता सुरू असलेल्या दुरुस्तीकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

डहाणू शहरात सद्यस्थितीत तब्बल २६ इमारती  धोकादायक अवस्थेत  आहेत. त्यातील डहाणू रोड झोराष्ट्रीयन अग्यारी ट्रस्ट फंडची अंजुमन इमाम मल्ल्याण (पूर्व) ही अत्यंत धोकादायक इमारत आहे. मात्र नगर परिषद ती अद्याप रिकामी करू शकलेली  नाही. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

डहाणू नगर परिषदेने धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारती पूर्णपणे जीर्ण झाल्या आहे. त्या कोणत्याही वेळेत कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. धोकादायक इमारती पाडण्यासाठी नगर परिषद जागा मालक तसेच विकासकांना नोटीस बजावण्याचे काम करीत आहे.  प्रत्यक्ष तोडकामाकडे डोळेझाक करीत असल्याने दुर्घटनेची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

डहाणूत एकूण  १८ हजार २४१  मालमत्ताधारक आहेत. यापैकी  १४ हजार ३५४  निवासी , तर   तीन हजार ७५८ बिगर निवासी  आहेत .यामध्ये  ३२९ मिश्र मालमत्ताधारक आहेत. डहाणू नगर परिषदेच्या हद्दीत १९ धोकादायक तर सात अतिधोकादायक इमारतींची यादी नगरपरिषदेने  जाहीर केली होती. यासंबंधी नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी रहिवासी राहात नाहीत त्या तातडीने पाडण्याचा  निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. श्रीजी अपार्टमेंटवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. धोकादायक इमारती खाली होत नसल्याने धोकादायक इमारतीं कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसापूर्वी डहाणू  नगर परिषदेने धोकादायक इमारतींची एक यादी तयार केली होती. त्यात उ-१ वर्गामध्ये सात इमारती अत्यंत धोकादायक  आहेत. उ-२  अ या वर्गात इमारती रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे यामध्ये सात  इमारती आहेत.तर उ-२ इ वर्गामध्ये पाच  इमारती रिकामी न करता संरचनात्मक दुरुस्ती करणे या वर्गामध्ये  आहेत. डहाणू नगर परिषद क्षेत्रात  एकू ण १९ इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत.

नियमाप्रमाणे इमारती धोकादायक जाहीर करण्याआधी नगर परिषदेचे अधिकारी त्या इमारतींचे स्ट्रक्चल ऑडिट करतात. त्यानंतर ती इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली जाते. पालिके कडून अशा धोकादायक इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो तसेच पाणीपुरवठा तोडला जातो. महापालिकेच्या उ-२अ आणि उ-२ इ वर्गामध्येही काही इमारती असतात. उ-२अ यादीत ज्या इमारती येतात त्या इमारतींच्या बांधकामाची दुरुस्तीची गरज असते. उ-२ इ इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते, अशी माहिती देण्यात येते.

डहाणूतील धोकादायक इमारती

शिलू इराणी (मिशन जवळ), चर्च ऑफ बधट बोर्ड- दोन मालमत्ता (मिशन जवळ ), बिंदू धरमदास फोंदा-पटेल पाडा- (तीन मालमत्ता ), किरण नवीनचंद पोंदा-पटेलपाडा, अस्पेंदीदर आर इराणी, जहाबश्र गुरुद इराणी व इतर -रेल्वे स्टेशन, पी. अथ्यंकर- मल्याण, पोलीस लाईन -(आगर ), श्रीजी अपार्टमेंट, श्री बेहराम अस्पेंदीयर सुरुम इराणी-मानफोडपाडा,अर्जुन मोहन कांबळी मल्याण (पूर्व), मेहता प्लॅस्टिक मल्याण (पूर्व), डहाणू रोड झोराष्ट्रीयन अग्यारी ट्रस्ट फंड ची अंजुमन इमाम मल्ल्याण (पूर्व), हरदीप सिंह सबरबाल द्वाप  श्रीमती  चापेकर-वडकुन, (सोडावाला चाळ), डिसूजा चाळ , इक्बाल हसन सौदागर व इतर मल्याण काटीरोड, गुरु कृपा मल्याण आदी  धोकादायक इमारती पाडण्यासाठी नगर परिषदने केवळ नोटीस बजावल्या आहेत.  मात्र प्रत्यक्ष कारवाई  करण्यात आलेली नाही.

 

Story img Loader