वाडा-मनोर रोडवरील सापणे फाटा येथील प्रकार

बोईसर :  तारापूर औद्योगिक क्षेत्रातून घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी केली जाणारी वाहतुकीचे छुप्या पद्धतीने सुरू असतानाच वाडा- मनोर रस्त्यावर असलेल्या वन विभागाच्या जंगल भागात घातक रसायनाचा कचरा सोडण्याचा  प्रकार समोर आला आहे. या रसायनामुळे परिसरातील गवत मृत झाले असुन रस्त्यावर चालणाऱ्या व वाहन चालकांना देखील याच्या दुर्गंधीचा त्रास जाणवत आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गपासून साधारणपणे १५ किलोमीटर अंतरावर  असलेल्या वरले व सापणे गावाच्या दरम्यान हे रसायन रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी सोडण्यात आले आहे. वाडा-मनोर रस्त्यावर हा भाग असुन येथील जंगल भागाचा फायदा घेऊन  माफियांनी रात्रीच्या वेळी हे रसायन टाकल्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरापासुन तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन टाकाऊ रसायनाची निचरा करण्यासाठी चोरटी पद्धतीने वाहतूक करण्याचे प्रयत्न उघकीस आले होते. तारापूर येथील काही केमिकल माफियांच्या माध्यमातून प्रदूषणकारी कारखानदारांकडून हे प्रकार सुरूच असून वाडय़ाजवळ घडलेल्या प्रकारात तारापूर येथील रसायन असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीकांन कडुन केली जात आहे.

Story img Loader