दापोली: दापोली – दाभोळ मार्गावर उंबर्ले रोहीदासवाडी स्टाॅप जवळ दापोलीकडून दाभोळकडे जाणारी एसटी ( एम.एच.०७ सी ७४०४) व दाभोळकडून दापोलीकडे येणाऱ्या दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचाजागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : सावंतवाडी: हवामान खात्याच्या येलो अलर्टमुळे गुजरातच्या १०० नौका देवगड बंदरात
दापोली- दाभोळ एसटी बस शुक्रवार २३ ऑगस्टला सकाळी ११ वाजता सुटून दाभोळकडे रवाना झाली होती. साडेअकराचे सुमारास ती उंबर्ले येथील बोरघरे यांच्या बागेसमोर आली असता दाभोळ कडून येणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार तैहसिन नियामुद्दीन मात्रोजी (वय ३५, रा. वणकर मोहल्ला, दाभोळ) याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेल्या शमशुद्दीन इस्माईल दांडेकर रा. दाभोळ याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला पुढील उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस, एसटी आगाराचे अधिकारी दाखल झाले असून पोलीस पंचनाम्याचे काम उशिरा पर्यत सुरु होते.