दापोलीच्या राजकीय पटलावर सध्या नेतृत्वबदलाचे वारे वाहत असून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेमध्ये आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चितीच्या निर्णयप्रक्रियेवर त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. ही नगरपंचायत निवडणूक १६ डिसेंबरला होणार असली तरी अनेक संभाव्य उमेदवार आतापासूनच तयारीला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेतृत्वबदलाचे सर्वात मोठे सावट शिवसेनेवर असून सध्या दापोलीमध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह खेडचे सुपूत्र आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही पक्षाच्या उमेदवार निश्चिती प्रकरणात सक्रीय सहभागाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी कोणत्या नेत्याशी संपर्क करायचा, या गोंधळात  संभाव्य उमेदवार पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनीही दापोली राष्ट्रवादीची सूत्रे पूर्णपणे स्वतकडे घेतली असून उमेदवार निश्चिती एकहाती करण्याचे संकेत दिले आहेत.

मागील नगरपंचायत निवडणुकीत ही सर्व सूत्रे पक्षाचे तात्कालिन मातब्बर नेते किशोर देसाई यांच्याकडे होती. ते विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत गेल्याने ती जबाबदारी आपसूकच खेडचे सुपूत्र असलेल्या आमदार संजय कदम यांच्याकडे आली आहे. नुकत्याच झालेल्या मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत कदम यांच्या पुढाकाराने महाआघाडी पॅटर्न चांगलाच यशस्वी ठरला होता.

त्या पाश्र्वभूमीवर दापोलीतील पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवरही त्यांनी स्वतचा दबदबा निर्माण केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या पुढाकाराने पक्षाने दापोली नगरपंचायत निवडणूक पहिल्यांदाच स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात यापूर्वी ही प्रक्रिया आघाडीत अधिक प्रभावी ठरणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाकडे सोपवण्यात येत असे.

यंदा मात्र काँग्रेसने आक्रमक होत पक्षाची उमेदवारी पक्षाचे नेतृत्वच ठरवेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. तशी निवडप्रक्रियाही पक्ष नेत्यांनी सुरू केली आहे. गेल्या नगरपंचायत निवडणुकीत तीन नगरसेवक निवडून आणणाऱ्या मनसेतून तात्कालिन जिल्हाध्यक्ष संतोष शिर्के बाहेर पडल्याने आता उमेदवार निश्चिती निर्णयप्रक्रीयेची जबाबदारी प्रथमच नगरसेवक नितीन िशदे आणि सचिन गायकवाड यांच्यावर आली आहे.

त्यातच पक्षाचे स्वीकृत नगरसेवक व मुत्सद्दी नेते प्रकाश साळवी यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाच्या निर्णयप्रक्रियेला आणखी मोठा फटका बसला आहे. भाजपसह रिपाई आणि बसप यांच्या नेतृत्वात मात्र कोणताही बदल झालेला नसून त्यांची उमेदवार निश्चिती सुलभपणे होण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader