आघाडीला अनुकूलता
दापोली नगरपंचायतीची निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. यंदा दापोलीमध्ये युतीचे भविष्य अंधारात असून आघाडीला मात्र पोषक वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर राट्रवादीचे आमदार संजय कदम, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि भाजपचे नेते केदार साठे यांचे डावपेच पणाला लागणार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा दापोलीत यापूर्वीच केली होती. त्यामुळे युतीच्या जागावाटपावरून भाजपला कोंडीत पकडणारे शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवींसह सर्व स्थानिक नेते आधीच डिवचले गेले आहेत. त्यातच राट्रवादीचे मातब्बर नेते किशोर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहरात पक्षाची ताकद वाढली आहे. साहजिकच शिवसेना आधीपासूनच सर्व प्रभागांमध्ये उमेदवार निवडीच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे भाजपनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्या विजयाने पक्षामध्ये नवसंजीवनी निर्माण झाली आहे. मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस-रिपाइंच्या साथीने विजय मिळवणाऱ्या संजय कदम यांची राजकीय मुत्सद्देगिरी दापोलीत पुन्हा पणाला लागणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच दापोलीत आघाडीला पोषक वातावरण असल्याचे सांगत आघाडीला अनुकूलता दाखवली होती. शहरातील अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी मंडणगडप्रमाणेच दापोलीतही महाआघाडी करण्याचा मानस आघाडीतील स्थानिक नेत्यांकडूनही व्यक्त होत आहे. दरम्यान, मागील निवडणुकीत मनसेने मारलेली बाजी यंदा कायम राहणार नाही, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. साहजिकच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना स्वत:चा करिश्मा सिद्ध करण्याच्या अग्निपरीक्षेला या वेळी सामोरे जावे लागणार आहे.

Story img Loader