मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवास कारणीभूत ठरलेले कुणबी समाजाचे उमेदवार शशिकांत धाडवे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत आहेत. पक्षसूत्रांकडूनही याला दुजोरा मिळत आहे. यामुळे शिवसेनेसह, राष्ट्रवादीलाही नव्या राजकीय आव्हानाला सामोरे जवे लागण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील निवडणुकीत सामजिक अस्मिता उफाळून आल्याने कुणबी समाजाने शशिकांत धाडवे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला. गावागावात असलेल्या समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले. कालांतराने त्यांना बहुजन समाजाचे नेते म्हणून हायलाईट करण्यात आले. या निवडणुकीत त्यांना तब्बल १९ हजार १०६ मते मिळाली. राष्ट्रवादीचे विजयी आमदार संजय कदम यांना मिळालेल्या ५२ हजार मतांपेक्षा ती संख्या खूप कमी असली तरी शिवसेनेच्या पराभवाला हेच मतविभाजन प्राधान्याने कारणीभूत ठरले. मात्र निवडणुकीनंतर शशिकांत धाडवे यांचा मतदार संपर्क कमी झाल्याने ही सामाजिक अस्मितेची मशाल विझल्याचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आपापले नागरी प्रश्न मांडण्यासाठी त्यांचा मतदार  शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे ओढला जाऊ लागला. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपसून शशिकांत धाडवे दापोलीत पुन्हा सक्रीय झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष

बाळ माने यांच्या पुढाकाराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास अनुकूलता दर्शवली असून त्यांच्या रूपाने भविष्यात भाजपची ताकद दापोली मतदारसंघात लक्षणीय प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे केदार साठ्ये यांना १३ हजार ९७१ मते मिळाली. त्यात धाडवेंची १९ हजार १०६ मते मिळवल्यास ही संख्या थेट ३३ हजारापर्यंत पोचते. दरम्यान, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील वादातून अनेक दळवी समर्थकांनी यापूर्वीच भाजपला अनुकूलता दाखवण्यास सुरूवात केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता जावकर यांच्यासारख्या मातब्बर महिला नेत्याने तर भाजपमध्ये प्रवेश करून या प्रवाह बदलाची मानसिकता स्पष्ट केली आहे. साहजिकच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत दळवी यांना शांत करण्यात पक्षश्रेष्ठी अपयशी ठरल्यास दळवी-कदम वादाने शिवसेनेच्या व्होटबँकेला भगदाड पडण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यांच्या समर्थकांचा मतप्रवाह भाजपकडे वळून या पक्षाची ताकद दापोली मतदारसंघात न भूतो न भविष्यती वाढण्याचे आता संकेत  आहे. मात्र ही शक्ती राष्ट्रवादीचा ५२ हजार ९०७ मतांचा विजयी आकडा गाठण्यात यशस्वी ठरणार का, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dapoli ready for election