दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याची कारवाई तुर्तास थांबवण्यात आलेली आहे. न्यायालयाने या प्रकरणी ‘जैसेथे’चे आदेश दिले आहेत. दरम्यान, आज सकाळीच भाजपाचे नेते किरीट सोमय्या या रिसॉर्टवर पोहोचले होते. तसेच प्रतिकात्मक हातोडा हातात घेत त्यांनी या रिसॉर्टच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे, सांगितले होते. दरम्यान, सोमय्यांच्या याच भूमिकेविरोधात उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल परब आक्रमक झाले आहेत. माझी बदनामी केली जात आहे. मी या रिसॉर्टचा मालक नाही, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली आहे. तसेच मी परब यांच्याविरोधात फौजदारी स्वरुपाची तक्रार दाखल करणार आहे, अशी माहितीदेखील परब यांनी दिली आहे. ते आज (२२ नोव्हेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> साई रिसॉर्ट प्रकरण: “हिंमत असेल तर…,” अनिल परब यांचं किरीट सोमय्यांना जाहीर आव्हान
“माझा यंत्रणांना विरोध नाही. मी यंत्रणांना सर्व माहिती दिलेली आहे. यंत्रणांनी मला अनेकवेळा बोलावले. प्रत्येकवेळी मी चौकशीसाठी हजर राहिलेलो आहे. अजूनही मी तपास यंत्रणांना सहकार्य करेन. कारण या रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही. काही दिवसांपूर्वी माझ्याविरोधात आणखी एक खटला दाखल करण्यात आला. या खटल्यात ४२० कलमाचा समावेश करण्यात आला. खोट्या तक्रारी करायच्या, पोलिसांवर, शासकीय यंत्रणावर दबाव टाकायचा असे केले जात आहे,” असा आरोप परब यांनी केला.
हेही वाचा >>> ‘सबका हिसाब होगा!’ २७ तारखेला मनसे नेमकं काय करणार? नेत्याच्या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण
“ही सगळी नौटंकी आहे. सोमय्या यांनी त्यांच्या पक्षात कोणीही विचरत नाही. मी सोमय्यांविरोधात यापूर्वी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. मात्र आता मी फौजदारी दावादेखील दाखल करणार आहे. मी क्रिमिनल रिट पिटिशन फाईल करणार आहे. माझ्याबद्दल बदनामीकारक वक्तव्यं करायची. माझा संबंध नसताना बातम्या द्यायचा, असे केले जात आहे. यामुळे माझी प्रतिमा खराब होत आहे,” असेदेखील अनिल परब यांनी सांगितले.