सीएमची व्याख्या फक्त ‘चीफ मिनिस्टर’ नाहीतर ‘कॉमन मॅन’ अशी होते, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. कुठलंही काम काम करताना कौशल्य आणि धाडस लागते. आपला हेतू शुद्ध असल्यावर कधीही घाबरायचं नाही, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. दिवाळीनिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “२०१९ साली मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल, अशी अनेकांची इच्छा होती. पण, करोनाळाचा काळ मध्ये आला. करोना काळात चांगलं काम करता आलं. मुख्यमंत्री असतो, तर मर्यादा आल्या असत्या. रूग्णालयात आणि रूग्णांना आवश्यक तिथे मदत करण्याचं काम केलं.”
हेही वाचा : “मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले, पण…”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
“मात्र, आपल्याला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. शेवटी कुठलंही काम करताना कौशल्य आणि धाडस लागतं. आपला हेतू शुद्ध असल्यावर कधीही घाबरायचं नाही. जेव्हा जनतेचा फायदा असतो, तेव्हा बिंधास्त काम करायचं असतं, मग काहीही घडो,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
हेही वाचा : “चोरांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय, आता…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
“माणूस कितीही मोठा झाला, तरी आपल्या लोकांना विसरता कामा नये. शेवटी पदे येतात आणि जातात. आपल्याकडील पदाचा लाखो आणि करोडो नागरिकांना फायदा कसा होईल, याकडं कटाक्षानं पाहिलं पाहिजे. सीएमची व्याख्या फक्त ‘चीफ मिनिस्टर’ नाहीतर ‘कॉमन मॅन’ अशी होते,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.