पोलीस दलात १० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना फौजदार होण्यासाठी राज्याच्या गृहखात्याने राज्यभर घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. उत्तीर्णाच्या यादीतच मोठा घोळ झाला असून, हा निकाल म्हणजे सावळा गोंधळच ठरला आहे. गृह खात्याने प्रसिद्ध केलेल्या गुणवत्तायादीत अनुत्तीर्णाना उत्तीर्ण दाखवण्यात आले असून, या प्रकाराने एकूण या निकालाविषयीच साशंकता व्यक्त होत आहे.  
पोलीस खात्यात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी झालेल्यांना फौजदारपदी संधी मिळावी यासाठी गृह खात्याने दि. ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यान राज्यातील विविध केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली. राज्यातील २९ हजार पोलीस शिपाई या परीक्षेस बसले होते. दि. १० ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची यादीही जाहीर झाली. मात्र त्यात झालेला घोळ चक्रावून सोडणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्य़ांत या यादीबाबत तक्रारी आल्या आहेत. काही उमेदवारांना कमी गुण मिळाले असतानाही त्यांना यादीमध्ये उत्तीर्ण दाखविण्यात आले आहे.
नगर जिल्ह्य़ातील उमेदवार भगवान भानुदास पालवे यांना लेखी परीक्षेत तिन्ही विषयांत एकूण ७५ गुण मिळाल्याने ते परीक्षेत अनुत्तीर्ण दाखविण्यात आले. त्यानंतर जाहीर झालेल्या फौजदार पदोन्नती यादीत मात्र त्यांचा समावेश आहे.
या प्रकाराने सर्वजण चक्रावून गेले आहेत. हा निकाल जाहीर होताच पोलीस दलात अस्वस्थता पसरली. काही ठिकाणी तर या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही काहींच्या पदरी अपात्रता आली आहे. फौजदारपदी संधी देण्यात आलेले बहुसंख्य कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत. तरुण उमेदवारांना नाकारण्यात आले आहे.

संगणकीय प्रणालीमुळे घोळ
निकालाविषयी राज्याचे पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की निकालाच्या प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत आमच्याकडे तक्रारी येत आहेत. २९ हजार उमेदवारांची यादी करताना संगणकीय प्रणालीत हा घोळ झाल्याचेही त्यांनी मान्य केले. याबाबत तातडीने सुधारणा करण्यात येत आहेत असे ते म्हणाले.