CM Eknath Shinde Dasara Melava: मोगलांच्या काळात त्यांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी-धनाजी दिसायचे तसा तुम्हाला मी दिसतोय का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण टाकलेली शिवसेना सोडवण्याचं काम मी केलं आहे. मी त्यात काही गुन्हा केलाय का? मी मुख्यमंत्री झाल्यापासून सरकार पडणार म्हणत होते. मात्र आमचे सरकार मजबूत आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, आमच्याकडे २१० आमदार आहेत. जोपर्यंत जनता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मी ठामपणे उभा आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आणि ठाकरे गटावर प्रहार केला आहे.
करोनाच्या काळात तुम्ही घरी पैसे मोजत होतात
करोनाच्या काळात तुम्ही घरी पैसे मोजत बसला होतात. खिचडीचे पैसे खाल्ले, ऑक्सिजनचे पैसे खाल्ले अरे कुठे फेडणार हे पाप? तुम्हाला जनता माफ करणार नाही. मुंबई महापालिकेच्या कारभारात काळ्याचं पांढरं करणारे तुम्हीच होतात. आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबईला कुणाचाही बाप तोडू शकत नाही. २००५ मध्ये तुम्ही (उद्धव ठाकरे) बाळासाहेबांना एकटं सोडून गेला होतात. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचेही होऊ शकला नाहीत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आनंद दीघेंविषयीचा तो किस्सा
उद्धव ठाकरे यांचं काही कर्तृत्व नव्हतं. पण राज ठाकरे प्रचंड मेहनत करायचे, त्यामुळे आनंद दिघे यांनी एका बैठकीत राज ठाकरे यांचं कौतुक केलं. यानंतर आनंद दिघे यांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच आनंद दिघे यांना ज्या-ज्या पद्धतीने वागवलं, त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, “याठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की, यांचं (उद्धव ठाकरे) तर काही कर्तृत्व नव्हतंच. पण राज ठाकरे प्रचंड मेहनत करायचे. तेव्हा एका बैठकीत धर्मवीर आनंद दिघे हे राज ठाकरेंबद्दल दोन शब्द चांगले बोलले. त्यानंतर लगेच आनंद दिघेंचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं. त्यांना ज्या-ज्या पद्धतीने वागवलं त्याचा साक्षीदार मी आहे. आनंद दिघेंचा अपघात झाल्यानंतर ते बघायला आले नाहीत. अंत्ययात्रेलाही आले नाहीत. आम्हीच त्यांची सगळ्यात मोठी समाधी बांधली. या समाधीला भेटदेखील दिली नाही. मी जेव्हा त्यांना (उद्धव ठाकरे) भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला विचारलं, आनंद दिघेंची संपत्ती कुठे कुठे आहे? अरे तो फकीर माणूस होता. त्यांच्याकडे काय संपत्ती असणार” असाही उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला.