Dasara Melava 2024: मुंबईमध्ये आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पार पडला. या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर भाष्य करत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यावरही टीका केली. “सरन्यायाधीश साहेब तुम्ही महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार वाचवलं, ते पाहता रात्रीची झोप कशी लागते?”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पहिलं भाषण केलं. शिवसेनेच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. तुम्ही म्हणाला आहात की वडिलांसमोर कधी भाषण केलं नाही. पण मी इतकचं सांगतो की तुम्ही आता लहान मुल नाही आहात, तुम्ही आता राज्याचे नेते आहात. महाराष्ट्र तुमच्याकडे फार अपेक्षाने पाहतो आहे. हा महाराष्ट्र लढण्यासाठी फक्त ठाकरेंच्या पाठिमागे उभा राहिला आणि यापुढेही राहील. खरं तर मशाली सारखं दुसरं चांगलं कोणतंही चिन्ह नाही. महाराष्ट्रात पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी मशाल हे चिन्ह आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : “आनंद दिघे असते तर त्यांनी शिंदेला गोळीच घातली असती..”; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“तुम्ही सर्वांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभव केला. आपल्याला आणखी दोन महिन्यांनी अजून एकदा पराभव करायचा आहे. त्यानंतर याच मैदानात आपल्याला विजयी मेळावा घ्यायचा आहे. आता हरियाणात निवडणुका झाल्या आणि निकाल लागले. इकडे देवेंद्र फडणवीस पेढे वाटत होते. काय तर म्हणे आम्ही हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही जिंकू. मी सांगतो निवडणुका होऊद्या तुमची हवा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला राज्याची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये द्यावी लागतील”, असं संजय राऊत म्हणाले.
“राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार वाढला आहे. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश हे पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर गणपतीची आरती करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरन्यायाधीश मोदक देतात. मग आम्हाला न्याय कसा मिळणार? आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न शिल्लक आहे. मी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचं एक निवदेन वाचलं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की, सरन्यायाधीश म्हणून देशाची सेवा चोकपण बजावत आहोत. पहाटेपासून काम केल्यामुळे रात्री समाधानाने झोप लागते. मात्र, इतिहास माझ्या कार्यकालाचे मूल्यमापन कसे करणार? याची मला चिंता आहे. अहो सरन्यायाधीश साहेब आपण या महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार वाचवलं. ते पाहता आपल्याला झोप कशी लागते? हा प्रश्न आम्हाला पडलाय. या राज्यात आणि देशात वाढलेल्या भ्रष्ट्राचाराला न्यायव्यवस्था देखील जबाबदार आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.