मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच सुरू होती. अखेर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे. एकीकडे या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी मोठा खुलासा केला आहे.
दसरा मेळाव्यावरून शिवाजी पार्कसाठी हट्ट करू नये, असा सल्ला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आधीच दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचा सल्ला न ऐकता शिवाजी पार्क मैदानासाठी आपला हट्ट कायम ठेवला. शुक्रवारी अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाची नाच्चकी झाली असून शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा- VIDEO : कंगना रणौत मथुरेतून लढणार का? हेमा मालिनी म्हणतात, उद्या राखी सावंतही…
राज ठाकरेंच्या सल्ल्याबाबत अधिक माहिती देताना मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, शिवसेनेत फूट पडल्यानंतर जेव्हा दसरा मेळाव्याचं प्रकरण समोर आलं, तेव्हा मनसेतील काही तरुण कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की, यंदा राज ठाकरेंनीच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यावा. ही मागणी राज ठाकरेंच्या कानावर घालण्याची जबाबदारी सर्व तरुण कार्यकर्त्यांनी माझ्यावर टाकली होती. याबाबत राज ठाकरेंशी जेव्हा बोलणं झालं, तेव्हा राज ठाकरेंनी मला खूप चांगलं उत्तर दिलं, ते म्हणाले की मागील कित्येक वर्षांपासून दसरा मेळावा म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे. या समीकरणात आपण जाणं हे कोतेपणाचं लक्षण ठरेल, हे समीकरण असंच राहायला पाहिजे. त्यामुळे दसरा मेळावा घेण्यासाठी मी फारसा उत्सुक नाही.
पुढे प्रकाश महाजन म्हणाले की, याबाबत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांनाही सल्ला दिला होता. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवरून अशा पद्धतीने राजकारण करू नका, ते फार कोतेपणाचं लक्षण दिसेल. यामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे राज ठाकरेंनी दिलेला सल्ला आणि दुसरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंवर असलेली त्यांची श्रद्धा. दसरा मेळावा, शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण घट्ट आहे. त्यामध्ये आपण जायला नको, ही राज ठाकरेंची भूमिका होती, असा खुलासा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे.