मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटांकडून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दसरा मेळाव्यांसंदर्भात सूचक विधान केलं आहे. शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तुम्ही राज्याचे प्रमुख आहात अशी आठवण करुन देताना दसरा मेळाव्याच्या माध्यमातून कटूता वाढणार नाही अशी मांडणी असेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरु झाल्याचा उल्लेख ही पवार यांनी केला.
नक्की वाचा >> थंड पाण्याची बाटली, लोणावळ्यातील हॉटेल अन् थेट CM शिंदेंच्या हत्येचा कट रचल्याचा फोन; ‘त्या’ कॉलमागील खरा घटनाक्रम
दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य करताना शरद पवार यांनी शिवसेनेचे दोन गट पडल्या बद्दल खंत व्यक्त केली. दोन गट झाले आणि स्पर्धा सुरु झाली आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरु झाली, असं म्हणत दसरा मेळाव्याला दोन्ही गटांनी स्पर्धेचा विषय केल्याचं पवार यांनी सूचित केलं. “दुर्दैवाने एका पक्षाचे दोन भाग झाले आणि त्यामधून एक स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं. गंमत अशी आहे की या गोष्टी होतात. संघर्ष होतो पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. ही मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते काही राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही,” असं पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कटूता पसेल असं काही करु नये अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त करुन दिली. तसेच ते एका पक्षाचे नेते नसून १४ कोटी महाराष्ट्रातील जनतेचं प्रतिनिधित्व करतात असं पवार म्हणाले. “राज्याचे जे जबाबदार लोक आहेत, त्या लोकांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकली पाहिजे आणि मग ती पावलं टाकण्याची जबाबदारी ही आमच्यासारख्या वरिष्ठ लोकांकडे असेल. त्याहीपेक्षा राज्याचे जे प्रमुख आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील पण महाराष्ट्राच्या १४ कोटी लोकांचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे,” असं पवार म्हणाले.
नक्की वाचा >> Dasara Melava: ‘काल रात्री या…’; शिंदे गटात जाण्याची चर्चा असतानाच मिलिंद नार्वेकरांनी शेअर केले फोटो
तसेच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, “अपेक्षा अशी करूयात की यामधून शेवटी जी काही उद्या ते (मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे) मांडणी मांडतील, त्यात कटूता नसेल अशाप्रकारची मांडणी दोन्ही बाजूंनी केली तर राज्यातील वातावरण सुधारायला मदत होईल,” अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.