महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या संदीप देशपांडे यांनी दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. रझा अकदमीच्या मुद्द्यावर एक शब्दही न बोलणारे उद्धव ठाकरे हे हिंदूत्व सोडलं का विचारत असल्याचा टोला देशपांडेंनी लगावला. तसेच त्यांनी रेल्वे भरतीसाठी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचाही संदर्भ दिला. त्याप्रमाणे त्यांनी ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघेंचे मेळावे म्हणजे एकमेकांना शिव्या घालण्यासाठी वापरल्यासारखं वाटल्याचंही म्हटलं.
नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”
आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशपांडे यांना पत्रकारांनी, “दोन दसरा मेळावे झाले ठाकरेंचे बाण तर शिंदेंचं प्रत्युत्तर आपली पहिली प्रतिक्रिया काय?” असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना देशपांडे यांनी मला ही नळावरची भांडणं वाटली असं मत व्यक्त केलं. “मला कोणाचेही बाण दिसले नाही. कोणाचंही प्रत्युत्तर दिसलं नाही. लोकांना वाटलेलं की शिवतीर्थावर आपल्याला विचारांचं सोनं लुटायला मिळेल. पण ज्या पद्धतीने दसरा मेळावा झाला तो पाहता नळावरची भांडणं आणि उणीधुणी दिसली. म्हणजे माझी बादली पुढे का सरकवली, तुझी बादली पुढे का आली या लेव्हलचा तो दसरा मेळावा होता. ज्या पद्धतीने मुद्दे मांडण्यात आले त्यात विचारांचं सोनं नव्हतं. मला वाटतं एकमेकांना शिव्या घालायला या मेळाव्याचा उपयोग झाला,” असं देशपांडे म्हणाले.
नक्की वाचा >> “बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडल्याची टीका करणारे स्वत: स्विझर्लंडला होते”, “ठाकरे लंडनला असायचे तेव्हा आम्ही नालेसफाई…”
तसेच भाषणामध्ये नवीन कोणतेच मुद्दे नव्हते असं सांगताना देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन रझा अकदामीचा मुद्दा उपस्थित करत लक्ष्य केलं. “नवे कोणतेचे मुद्दे नव्हते. रझा अकादमीचा जो मुद्दा होता त्यावर यांच्या तोंडातून एक शब्द बाहेर निघाला नाही. काल ते सगळ्यांना विचारत होते मी हिंदूत्व सोडलंय का सांगा. कोणं तिथं बसून सांगणार आहे की तुम्ही सोडलं म्हणून? जतनेला विचारा. रझा अकादमीच्या वेळेला तुम्ही गप्प होता. एक चकार शब्द तुम्ही तोंडातून काढला नाही,” असं संदीप देशपांडे म्हणाले.
नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप
तसेच मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या रेल्वे भरती आंदोलनाचा आणि मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचाही उल्लेखही देशपांडेंनी केला. “ज्यावेळेला परप्रांतीय मराठी माणसांच्या नोकऱ्या खात होते. त्या रेल्वेभरतीचं सर्वात मोठं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं. त्यावेळेला तुम्ही काय केलं? तुम्ही शेपट्या घालून घरी बसलात. ज्या वेळेला मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढायचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या आदेशाने करत होते तेव्हा तुम्ही आमच्यावर तडीपारीच्या केसेस टाकल्या. तुमच्या कोणत्या शिवसैनिकावर तडीपारीची केस टाकली तर तुम्हाला लगेच झोंबलं. त्यावेळेला आमच्यावर केसेस टाकल्या तेव्हा नाही झोंबलं? हे तुमचं हिंदूत्व आहे का?” असे प्रश्न देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना विचारले.