गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर मंगळवारी लगेचच निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकासंदर्भातील महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होतील. तर जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या निवडणुका त्यानंतर जाहीर केल्या जातील अशीही माहिती मिळतेय. जम्मू – काश्मीरमधल्या पुरामुळे तिथल्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सोमवारी दुपारी निवडणुका मंगळवारी जाहीर होऊ शकतात, असा संदेश व्हॉट्सअ‍ॅप वर फिरू लागल्याने नेत्यांची तारांबळ उडाली. त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना निवडणुका मंगळवारी जाहीर होऊ शकतात, असे विधान केल्याने नेत्यांची लगबग वाढली. अनेक नेत्यांनी वृत्तपत्रांच्या कार्यालयात दूरध्वनी करून यासंदर्भात विचारणा केली.
निवडणूक आयोग मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करू शकतो आणि या घोषणेसोबतच आचारसंहिता लागेल, हे लक्षात येताच अनेक आमदार व खासदारांनी त्यांची रखडलेली विकासकामे मार्गी लागावी म्हणून शासकीय कार्यालयांकडे धाव घेतली. सार्वजनिक बांधकाम खात्यात तर आज अगदी झुंबड उडाली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी दूरध्वनी करून तर काहींनी स्वत: कार्यालयात येऊन विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आग्रह धरला. वनखात्याचे मुख्यालय येथे आहे. तेथेही आज निधी वाटपाची लगबग सुरू होती. आचारसंहिता लागल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवता येत नाही. त्यामुळे या प्रक्रियेत अंतिम टप्प्यात असलेली कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न आज दिवसभर सुरू होता. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सायंकाळी झाली, तर उद्याचा दिवस कामासाठी मिळेल, असे काही अधिकारी बोलून दाखवत होते. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नेत्यांचे लक्षसुद्धा शासकीय कार्यालयातील घडामोडींकडे लागून होते.