भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी त्यांच्या मृत्यूपत्राबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये मोठा खुलासा केलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचे नाव आपण मृत्यूपत्रामध्ये लिहलेलं आहे, असं खुद्द दत्ता मेघे यांनी सांगितलं आहे. मेघे हे वर्ध्यात नगरपालिकेच्या विविध कामाच्या ई भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त बोलत होते. गडकरी यांच्या हस्ते नगरपालिकेच्या कामांचं ई भूमिपूजन करण्यात आले.
गडकरी हे आमच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत. मृत्यूपत्रात कुठं काही घोळ होऊ नये यासाठी आपण मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं आहे. देशातील नेतृत्व दिवस रात्र काम करुन या देशाचा विकास झाला पाहिजे यासाठी झटत आहे. गडकरी हे देशातील प्रत्येक राज्यामध्ये जाऊन काम करत आहेत, असं मोघे यांनी म्हटलं आहे. मेघे यांनी भाषणादरम्यान हे वक्तव्य केलं तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंचावर त्यांच्या बाजूलाच बसलेले होते.
या कार्यक्रमाला गडकरींबरोबरच खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरीता गाखरे, नगराध्यक्ष अतुल तराळे यांचे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.