पंढरपूर : सोलापूरचा पालकमंत्री असताना आमदारांना मागण्याची वेळ मी येऊ देत नव्हतो. जर करोना काळ नसता तर सोलापूरकरांनी मला डोक्यावर उचलून धरले असते अशी आठवण सांगत यंदा पालकमंत्रिपद मिळाले नसल्याची खंत राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्र्यांचा तिढा सोडवता सोडवता मुख्यमंत्र्यांची दमछाक झाली. अजूनही काही जिल्ह्यांतील पालकमंत्री पद रिक्त आहेत. तसेच तिन्ही पक्षांचे मंत्री, नेते एकमेकांवर संधी मिळाली की टीका करत आहेत. असाच काहीसा प्रकार पंढरपूरमध्ये घडला. तालुक्यातील वाखरी येथे वारकरी भवन या वास्तूचे भूमिपूजन राज्याचे क्रीडा मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री भरणे यांनी पालकमंत्री असतानाच्या आठवणी सांगत पालकमंत्रिपद न मिळाल्याची खंत आणि विद्यमान पालकमंत्री गोरे यांच्यावर टीकेची संधी भरणे यांनी सोडली नाही. सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विविध विकासकामांची मागणी या वेळी केली. तो धागा पकडून भरणे यांनी टोलेबाजी केली.
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर सोलापूरचे पालकमंत्री भरणे होतील अशी परिस्थिती होती. मात्र मुख्यमंत्री यांनी नवीन आणि आक्रमक चेहरा म्हणून जयकुमार गोरे यांना पालकमंत्री केले. त्यामुळे अनेकजण नाराज असल्याची चर्चा होती. त्याचा प्रत्यय या कार्यक्रमातून दिसून आला. मी सोलापूरचा पालकमंत्री असतो तर तुम्हाला बोलू दिले नसते. त्यावेळी मोहिते पाटील विरोधक होते. पण त्यांची कामे मार्गी लावली. विरोधकांची कामे लगेच मार्गी लागतात असे भरणे म्हणाले. तसेच करोना काळात मी काम केले. जर करोना नसता तर सोलापूरकरांनी मला डोक्यावर घेतले असते. विरोधक आणि सत्ताधारी यांची सांगड घालून जिल्ह्याचा विकास केला असता असेही भरणे म्हणाले. सध्याचे पालकमंत्री हे मोहिते पाटील यांना विरोध करण्यासाठी आणले आहेत अशी टीका होत आहे. मात्र गोरे सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करायचा असे जाहीर बोलत आहेत. असे असले तरी भरणे यांना सोलापूरचे पालकमंत्रिपद हवे होते त्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.