गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम चर्चेत आला आहे. आधी कराचीत उपचारांसाठी तो दाखल झाल्याच्या वृत्तामुळे आणि नंतर त्याच्या मालमत्तेच्या लिलावामुळे. दाऊद इब्राहिमच्या भारतातील चार मालमत्तांची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यापैकी दोन मालमत्तांना कोणतीही बोली लावण्यात आली नाही. मात्र, एका मालमत्तेसाठी १५ हजार रुपयांची किंमत ठरवली असताना त्यासाठी तब्बल २ कोटींची बोली लावून तिची खरेदी दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी केली. त्यामुळे यावरून सध्या चर्चा सुरू झाली असताना आता दाऊदच्या कुटुंबीयांकडून आपल्याला फोन आले होते, असा खुलासा अजय श्रीवास्तव यांनी केला आहे.
“दाऊदला हरवायचंय”
वकील अजय श्रीवास्तव हे दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांच्या प्रत्येक लिलाव प्रक्रियेत सहभागी होतात. आपल्याला दाऊद इब्राहिमला हरवायचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठीचा हा आपला मार्ग असल्याचं ते म्हणाले. दाऊद इब्राहिमच्या खरेदी केलेल्या मालमत्तांवर सनातन शाळा उभारायची असल्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
“तीन-चार वर्षांपूर्वी दाऊदच्या कुटुंबीयांनी त्यांच्या वकिलांकरवी माझ्याशी संपर्क साधला होता. ते म्हणाले की तू ही सगळी मालमत्ता पुन्हा आम्हाला दे, तुला किती पैसे हवेत ते सांग. मी त्यांना स्पष्ट नकार दिला. कारण माझा हेतू हा पैसे कमावणे नाही”, असं अजय श्रीवास्तव म्हणाल्याचं एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
कोण आहेत अजय श्रीवास्तव?
अजय श्रीवास्तव यांनी याआधी दाऊद इब्राहिमच्या तीन मालमत्तांची खरेदी केली आहे. रत्नागिरीच्या मुंबेक गावातील दाऊद इब्राहिमचं बालपणीचं राहतं घरही त्यात आहे. आपला ज्योतिषावर विश्वास असून नुकत्याच खरेदी केलेल्या जमिनीचा सर्वे नंबर आपल्यासाठी लकी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. “मी दोन प्लॉट खरेदी केले आहेत. एवढी किंमत देऊन मी या जमिनी खरेदी केल्या कारण त्यांचा सर्वे नंबर माझ्या जन्म तारखेशी मिळतादुळता आहे. त्यालाच लागून असलेली जमीनही मी खरेदी केली आहे. तिथे मला सनातन धर्म शाळा उघडायची आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.