मुंबईतील १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्या कौटुंबिक मालमत्तांचा आज लिलाव झाला. चार मालमत्तांपैकी दोन मालमत्तेसाठी कुणीही रस दाखविला नाही. तर इतर दोन जागांसाठीचा लिलाव मुंबईत संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुंबके या गावात शेतजमीन आणि घर अशा स्वरुपात मालमत्ता आहेत. आज एका जागेची बोली २.०१ कोटींवर लागली तर दुसऱ्या मालमत्तेसाठी ३.२६ लाखांची बोली लागली. विशेष म्हणजे दोन कोटींना विकल्या गेलेल्या जमिनीची मूळ किंमत १५ हजार ४४० इतकीच होती, मात्र लिलावात चढ्या दरात त्याची विक्री झाली. तर ३.२६ लाख बोली लागलेल्या जमिनीची मूळ किंमत १,५६,२७० एवढी होती.
अर्थ खात्याच्या राजस्व विभागातर्फे मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयात सदर लिलाव संपन्न झाला. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील मुंबके गावात असलेल्या चार शेतजमिनींचा लिलाव करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. दोन मोठ्या शेतजमिनीसाठी कुणी प्रतिसाद दिला नाही. दिल्लीतील वकील भूपेंद्र भारद्वाज हे या लिलावात सहभाग झाले होते. याआधीही त्यांनी मुंबईतील दाऊदची संपत्ती विकत घेण्यासाठी लिलावात सहभाग घेतला होता.
लिलावानंतर माध्यमांशी बोलताना भारद्वाज म्हणाले, मी दोन संपत्तीसाठी बोली लावली होती. मात्र सिल टेंडर प्रक्रियेत मला यश आले नाही. यापैकी एका संपत्तीची मूळ किंमत १५ हजार असल्याचे सांगितले गेले होते. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, या जागेचे क्षेत्रफळ १७०.९८ स्क्वेअर मीटर इतके आहे.
वरील दोन्ही मालमत्तांवर वकील अजय श्रीवास्तव यांनी यशस्वी बोली लावली. श्रीवास्तव हे शिवसेनेचे माजी नेते आहेत. २००१ साली त्यांनी मुंबईतील दाऊदची दोन व्यावसायिक गाळे आणि २०२० साली दाऊदचे घर लिलावात मिळवले होते. गाळे नंतर कायदेशीर खटल्यात अडकले. मात्र घराचा ताबा श्रीवास्तव यांना लवकरच मिळणार आहे. तिथे ते सनातन शाळा सुरू करण्यार असल्याचे म्हणाले होते.