आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्या कौटुंबिक मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुंबके या गावात शेतजमीन आणि घर अशा स्वरुपात मालमत्ता आहेत. तस्कर आणि परकीय चलन छेडछाड (मालमत्ता जप्त करणे) कायद्याखाली (SAFEMA) ही कारवाई करण्यात येत आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
चारही मालमत्तांची एकत्रित रक्कम १९ लाख एवढी असल्याचे सांगितले जाते. याआधीही या मालमत्तांचा लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र ग्राहक उपलब्ध न झाल्यामुळे आधीचे प्रयत्न अपयशी ठरले. दाऊदशी संबंधित असल्यामुळे कुणीही या मालमत्ता विकत घेण्यासाठी पुढे आले नाही. आता SAFEMA ने स्वतः पुढाकार घेऊन यांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे.
५ जानेवारी रोजी मुंबई येथे सदर लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलावासाठी नोंदणी करण्याची आजची (३ जानेवारी) शेवटची मुदत होती. मागच्या ११ वर्षात दाऊदशी संबंधित असलेल्या एकूण ११ मालमत्तांचा लिलाव आतापर्यंत करण्यात आलेला आहे. यामध्ये ४.५३ कोटींच्या एका रेस्टॉरंटचा समावेश आहे. ३.५३ कोटींच्या सहा सदनिका आणि ३.५२ कोटी रुपयांच्या एका गेस्ट हाऊसचा समावेश आहे.
दाऊद इब्राहिमचे कुटुंबिय १९८३ रोजी खेड तालुक्यातील मुंबके गावातून मुंबईला स्थलांतरीत झाले होते. त्याआधी दाऊदचे बालपण याच गावात गेले असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे. १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमागे दाऊदचा हात होता. या बॉम्बस्फोटात २५७ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता.