DCM Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. मात्र, याच स्पष्टवक्तेपणामुळे कधी-कधी अजित पवार अडचणीत आल्याचंही पाहायला मिळतं. गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवार हे केंद्रबिंदू ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर बारामती राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही चर्चेत राहिली. लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही सर्वांच्या नजरा या बारामतीकडे लागल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत.
दरम्यान, महायुती सरकारच्या हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार परदेश दौऱ्यावर गेले होते असं सांगितलं जात होतं. आता परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्धाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याचवेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा : ‘महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत, शिर्डीतील मोफत जेवण बंद करा’, सुजय विखेंचं विधान चर्चेत
नेमकं काय घडलं?
एका पेट्रोल पंपाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन दिले जात होते. त्यानंतर अजित पवारही ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते. मात्र, याचवेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाले नसल्याचं म्हटलं. त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिकांनीही तसंच म्हटलं. यानंतर अजित पवार हे काहीसे संतापले आणि म्हणाले, “अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला.
अजित पवारांच्या विधानावर मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
“काही वेळेला असं होतं की लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार देखील आपण काही तारतम्य न ठेवता थेट हे काम झालंच पाहिजे असा आग्रह करतात. त्यावेळेला एखाद्यावर रागावणं हे सहाजिक आहे. एखादा लोकप्रतिनिधी उलट बोलला तर त्याची बातमी होते. पण एखादा नागरिक बोलला तर त्याची बातमी होत नाही. कदाचित अजित पवार यांनी रागाच्या भरात ते वक्तव्य केलं असावं”, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.