राज्य धिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधत विविध मुद्यांवरून आमने-सामने येत आहेत. राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यावर सत्ताधारी उत्तर देत आहेत. अधिवेशन सुरु असताना अनेकदा सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये कधी-कधी जुगलबंदी रंगताना पाहायला मिळते. अनेकदा सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांकडून दिलखुलास प्रश्नांना दाद दिली जात जाते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्पष्ट वक्ते म्हणून ओळखलं जातं. अजित पवारांची अनेक विधानं चर्चेत असतात. मात्र, आज अजित पवार यांनी सभागृहात बोलताना चांगलीच राजकीय फटकेबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना अजित पवार यांनी एक सूचक विधान केलं. “जयंत पाटील यांना घेऊन जाण्यासाठी आम्ही तयार आहोत”, असं सूचक विधान अजित पवारांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ दिली. त्यानंतर जयंत पाटील हे महायुतीबरोबर जाणार अशा चर्चा अनेकदा रंगल्या. मात्र, या सर्व चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या. आता अजित पवारांनी केलेल्या विधानाचा अर्थ नेमका काय? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

हेही वाचा : Video: “काय करणार, जबाबदारी वाढली की मूड बदलावा लागतो”, अजित पवारांची टोलेबाजी; शेरोशायरीतून विरोधकांना टोला!

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

सध्या अनेक पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले, “उद्या बारामतीत पालखी मुक्कामी येणार आहे. त्यामुळे परवा सकाळपासून मी तिकडे असणार आहे. मी काटेवाडीपर्यंत पालखी सोहळ्यात चालणार आहे. आता सर्वांनाच पालखीमध्ये चालत जावसं वाटतं. मग आपणही पालखीमध्ये सहभागी झालं पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

जयंत पाटलांबाबत अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार सभागृहात पालखी सोहळ्याबाबत बोलत असतानाच सभागृहात पाठिमागे बसलेल्या एका सदस्याने जयंत पाटील यांनाही घेऊन जा, असं अजित पवारांना सुचवलं. मात्र, यावर बोलताना अजित पवारांनी सूचक विधान केलं. अजित पवार म्हणाले, “जयंतरावर येतील की नाही काय माहिती? मी घेऊन जायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे”, असं सचूक विधान अजित पवारांनी केलं. त्यांच्या विधानामुळे जयंत पाटील यांना अजित पवारांनी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.