गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडला गेला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. आज तिन्ही मंत्री विधान परिषदेत असल्याने एकच हशा पिकला होता. तसंच, जोरदार टोलेबाजी करत सभागृह दणाणून सोडला होता. यावेळी अजित पवारांनीही राम शिंदेंचं कौतुक करताना गिरीश महाजनांवर टोला लगावला.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचं अभिनंदन करताना अजित पवार म्हणाले की, “सभापती महोदय तुमच्या मतदारसंघात मी सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला. त्यामुळे विधानसभा निवडणूक हरल्याचेही आपण म्हणाला. पण, एका दृष्टीने ते योग्य झालं. जर विधानसभा निवडणुकीत निवडून आला असता देवेंद्रजींनी ठरवले असते तर मंत्रीही झाला असता. त्यामुळे गरीशला (महाजन) कदाचित थांबावे लागले असते. हे सर्व जाऊद्या, पण आज तुम्ही विधिमंडळात सर्वोच्च स्थानी आहात.”

हेही वाचा >> Ajit Pawar : “आपण हरलात ते योग्य झालं”, राम शिंदेंचे अभिनंदन करताना अजित पवारांची टोलेबाजी

ते पुढे राम शिंदेंना म्हणाले, “आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यातही रुबाबदार आहात. २००९ ते २०१४ मध्ये आम्ही सत्ताधारी पक्षात असताना तुम्ही विरोधात होता. तेव्हा तुम्ही शांतपणे सभागृहात बसायचास. सत्तेत आल्यानंतर तुम्ही राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री झालात तेव्हा तुमचा सफारी आणि देखणेपणा पाहून वाटायचं की काय बदल झालाय. आज राम शिंदेंमध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय. त्यांची सफारी हाफ असायची.” तेवढ्यात गिरीश महाजनांनी काहीतरी टीप्पणी केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, “गिरीश कधीतरी सुधरा, कधीतरी सुधरा. आताही कट होता होता वाचला आहात”, अशी मिश्किल टिप्पणी करत सभागृहात एकच हशा पिकला.

कोण आहेत राम शिंदे?

सध्या भाजपाकडून विधान परिषद आमदार आणि आता सभापती असलेले राम शिंदे २००९ मध्ये पहिल्यांदा नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले होते. पुढे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यानच्या काळात भाजपाने राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिंदेंचा सुमारे १२०० मतांनी निसटता पराभव झाला होता.

Story img Loader