Ajit Pawar Baramati Speech: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील जाहीर झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं आणि राज्य उत्पादन शुल्क हे खातं देण्यात आलं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आणि खातेवाटपानंतर आज अजित पवार यांचा बारामतीत जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार यांनी बारामतीत कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच लाडक्या बहि‍णींचेही आभार मानले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीचा एक किस्सा सांगितला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी काही चॅनेलवाल्यांनी पोस्टल मतांमध्ये मी पिछाडीवर असल्याचं दाखवलं. मात्र, तेव्हा माझी आई थेट देवघरात जाऊन देवाचा जप करत बसली होती, असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : आता तुमची पुढची भूमिका काय? छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “निर्णय घेण्यासाठी माझी…”

अजित पवार काय म्हणाले?

“माझी यावेळी आठव्यांदा निवडणूक होती. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक आली होती. आता विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल होता, त्या दिवशी मतमोजणी सुरु झाली. तेव्हा सुरुवातीला काही चॅनल्सवाल्यांनी कहरच केला. मतमोजणी सुरु असताना पोस्टल मतांच्या मोजणीनुसार अजित पवार पिछाडीवर. तेव्हा माझी आई आमच्या घरातील देवघराच्या समोर बसली. तेव्हा माझी मोठी बहीण तिथे होती. तेव्हा आई तिला म्हणाली की असं कसं झालं. तेव्हा ती म्हणायची की नाही असं नाहीये. आम्ही बारामतीत फिरलो आहोत. काळजी करु नको. पण आई देवाचा जप करत बसली. पांडुरंगा, विठ्ठला असा जप आई करत बसली होती”, असा किस्सा अजित पवारांनी आज बारामतीत मेळाव्यात बोलताना सांगितला.

Story img Loader