लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते महाराष्ट्रातल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना होणार आहे. जो शरद पवार विरुद्ध अजित पवार असा म्हणूनही चर्चेत आहे. अशात अजित पवार यांनी त्यांच्या विरोधात गेलेल्या भावंडांना थेट इशाराच दिला आहे. कुणाचंही नाव न घेता अजित पवारांनी इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय शिवतारेंना कोणी केले फोन?

बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना नेते विजय शिवतारे उभे राहणार होते. त्यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांना माघार घेतला. विजय शिवतारे यांनी माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांनी त्यांना फोन केला. माघार घेऊ नका, असे स्पष्ट सांगितले.

तुम्हाला ते दाखवले तर कळेल कोणाचे नंबर आहेत. ते नंबर पाहून मला वाईट वाटले. हे नंबर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दाखवले. सध्या कुठल्या पातळीचे राजकारण चालले आहे, हे दिसत आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

बारामतीत मतं मागण्याची लेव्हल होती

“बारामतीमध्ये मतं मागण्याची काहीतरी लेव्हल होती. ही लेव्हल आता सोडायला लागले आहेत. आणि त्यातून लोकांना भावनिक केलं जातंय. त्यातून काही सांगितलं जातंय. नुसतं संसदेत भाषणं करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही. हा अजित पवारही भाषणात नंबर एकचा आहे. माझी पट्टी लागली तर मीही भाषणं करतो. पण मी भाषणंही करतो आणि कामंही करतो. मी विकासाला निधीही आणतो आणि एखादं काम वाजवून करून घेतो”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी काय इशारा दिला?

बारामतीत भाषण करताना अजित पवार म्हणाले, मी निवडणुकीला उभा होतो तेव्हा कधीही भावंडं फिरली नाहीत. आता गरागरा फिरत आहेत. पावसळ्यात छत्री उगवतात, तशी ही उगवली आहेत. लक्षात ठेवा मी फार तोलून मापून बोलतो आहे. जर एकदा मी तोंड उघडलं तर कित्येक लोकांना फिरता येणार नाही. तोंड दाखवता येणार नाही. कुणी पाणीही देणार नाही. मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का? अशा शब्दांत अजित पवारांनी इशारा दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm ajit pawar gave waring to his brothers who are speaking aganist him scj