नांदेड : जिल्हा आणि तालुकास्तरावरील वेगवेगळ्या समित्या, विशेष कार्यकारी अधिकार्यांच्या नियुक्त्या आणि जिल्हा नियोजन समित्यांच्या निधीचे वितरण यासंदर्भात महायुती सरकारमधील तीन पक्षांनी एक धोरण निश्चित केले असून ते १ एप्रिलनंतर लागू होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे जाहीर केले.
समित्या-निधी आणि नियुक्त्यांसंदर्भात तीन पर्क्षांच्या मंत्र्यांच्या एका समितीने निश्चित केलेल्या धोरणांची माहिती पवार यांनी गेल्या रविवारी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय बैठकीमध्ये दिली. या बैठकीला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नवाब मलिक, आ.संजय बनसोडे, आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ.चिखलीकर व जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी यांनी पवार यांचे स्वागत केेले.
ज्या मतदारसंघामध्ये महायुतीतील ज्या पक्षाचा आमदार आहे, त्या पक्षाला तालुकास्तरीय समितीत ६० टक्के तर उर्वरित दोन पक्षांना प्रत्येकी २० टक्के प्रतिनिधित्व राहील. जेथे महायुतीचा आमदार नाही, अशा मतदारसंघात आमच्यातील जो पक्ष दुसर्या क्रमांकावर राहिला, त्या पक्षाला जास्त प्राधान्य राहील, असे पवार यांनी स्पष्ट केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या वितरणात पालकमंत्र्यांना ३० टक्के तर उर्वरित ७० टक्के निधी त्या जिल्ह्यातील आमदारांमध्ये विभागला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या शिफारशी ५० टक्के तर अन्य दोन पक्षांना २५ टक्क्यांप्रमाणे समान प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. मंत्री समतीने निश्चित केलेल्या धोरणांनुसार समित्या तयार होतील, अशी माहिती पवार यांनी दिली. ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात महायुतीचा धर्म पाळतानाच वाद निर्माण करणारे वक्तव्य करू नये, असे आवाहन पवार यांनी केले.
पक्षविस्तार न झाल्याची कबुली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर आपला पक्ष सतत सत्तेमध्ये राहिला; पण ज्या प्रमाणात पक्षाचा विस्तार व्हायला हवा होता तसा झाला नाही. याची कबुली देतानाच पक्षाध्यक्ष या नात्याने पवार यांनी वरील बैठकीत कार्यकर्त्यांना शेती-रोजगारांच्या प्रश्नांपासून जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांपर्यंत मार्गदर्शन केले. अंग झटकून काम करा, कुवतीप्रमाणे काम करा आणि फुशारक्या मारू नका, असा मंत्र त्यांनी दिला. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर पक्षाचे मंत्री राज्यभर दौरे करणार आहेत. युवक-युवतींसह समाजातील विविध घटकांना पक्षामध्ये आणा. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक घराला राष्ट्रवादीशी जोडा, असे आवाहन पवार यांनी वरील बैठकीत केले.