Ajit Pawar On Eknath Shinde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच राज्यातील १४ लाख विद्यार्थींची तपासणी सरकार करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. याबरोबरच अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होणार असून आम्ही अर्थसंकल्पामधून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांच्या एका विधानाबाबत अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना म्हणाले की पुण्यात भगवा फडकावयचा आहे, यावर अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात’, असं अजित पवार खोचकपणे म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले?
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांशी बोलताना पुण्यात आपल्याला भगवा फडकवायचा आहे, असं विधान केलं असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं. यावर अजित पवार यांनी म्हटलं की, “आम्ही महायुतीमध्ये काम करत आहोत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. आता देवेंद्र फडणवीस हे देखील एखाद्या जिल्ह्यात गेले तर ते देखील म्हणू शकतात की आपल्याला त्या जिल्ह्यात भाजपाचा झेंडा फडकायचा आहे. त्यामुळे त्यात विशेष काही नाही. आम्ही फार एकजुटीने राहायचं ठरवलेलं आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी विधान केली जातात”, असं अजित पवार यांनी म्हटलं.
राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांची तपासणी करणार
“बाल स्वास्थ कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवणार आहोत. राज्यातील सर्वच अंगणवाडीत असणारे लहान मुले आणि प्राथमिक शाळेत शिकत असलेले मुलांची आरोग्य तपासणी करणार आहोत. यामध्ये २५ लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासले जाणार आहे. त्यामधून त्या बालकाला काही आजार आहे का? तसेच बालकाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहेत”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होणार
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होणार आहे. ३ मार्च रोजी अर्थसंकल्पात पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. तसेच १० तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकारे अर्थसंकल्पामधून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रकारे राज्य सरकार देखील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पामधून करणार आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.