Ajit Pawar On Loan Waiver of Farmers : राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने झाले आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकार सत्तेत आल्यानंतर आता त्या घोषणा हवेतच विरल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं, त्यामुळे लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये मिळण्याची आशा लागली होती. मात्र, आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेबाबत नवीन निकष लावणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात महायुतीच्या काही नेत्यांनी सूचक विधानेही केले आहेत. यातच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी आशा लागलेली आहे. मात्र, अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात एक मोठं विधान केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (२८ मार्च) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? याबाबत मोठं भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, “मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आज तारीख आहे २८ मार्च, मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो. ३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
कर्जमाफीबाबत अजित पवारांनीही याआधी केलं भाष्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?”, असं विधान अजित पवार यांनी केलं केलं होतं. दरम्यान, यानंतर आता अजित पवार यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीबाबत सूचक भाष्य कर्जमाफीबाबत प्रश्न निर्माण केले आहेत.